कोव्हिडबाबत शासनाचे नियम पाळा नाहीतर होणार गुन्हे दाखल
‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली. शासनाच्या दिशानिर्देशानुसार सर्व नियमांचे पालन करावे या अटीवर दैनंदिन कामकाज सुरू करण्याची सवलत देण्यात आली. नागरिकांना प्रशासनातर्फे वेळोवेळी आवाहन करण्यात आले. मात्र, नागरिक नियम पाळत नसल्याचे झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या आणि वाढत्या मृत्युसंख्येवरून दिसू लागले आहे. त्यामुळे आता नियम तोडणाऱ्यांवर तात्काळ प्रभावाने साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत सरळ गुन्हे दाखल करण्यात यावे, असे निर्देश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले.
वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक शहरात लॉकडाऊन करण्यात आले. मात्र, नागपुरात लॉकडाऊन करण्याची गरज पडू नये, यासाठी आता नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात यावी या विषयावर शुक्रवारी (ता. १७) नागपुरातील मनपाच्या दहाही झोनचे सहायक आयुक्त आणि पोलिस प्रशासनातील अतिरिक्त आयुक्तांसह सर्व झोनचे उपायुक्त यांची संयुक्त बैठक मनपा मुख्यालयातील आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.
बैठकीला मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाणे, उपायुक्त निर्भय जैन, अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, पोलिस उपायुक्त सर्वश्री विवेक मासाळ, राहुल माकणीकर, विक्रम साळी, निलोत्पल, श्वेता खेडकर, विनिता एस., पोलिस निरीक्षक वर्षा देशमुख आणि मनपाच्या दहाही झोनचे सहायक आयुक्त उपस्थित होते.
‘मिशन बिगीन अगेन’ सुरू होण्यापूर्वी नागपुरात ४०० च्या जवळपास कोव्हिड रुग्णसंख्या होती. मात्र, १६ जुलैपर्यंत ती २१०० च्या घरात गेली. म्हणजेच दीड महिन्यात १७०० रुग्णवाढ झाली. याचाच अर्थ नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे वेळोवेळी आवाहन करण्यात येत असूनही ते केले जात नाही. बाजारात व्यापाऱ्यांना ताकीद देऊनही सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात येत नाही. मास्कचा वापर केला जात नाही.
दुकानांसाठी जे नियम आखून दिले आहेत, त्याचेही उल्लंघन होत आहे. नाईट कर्फ्यूची ही गांभीर्यपूर्वक अंमलबजावणी करण्याचे आवाहन त्यांनी पोलीस विभागास केले.आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यापुढे मार्केट परिसरात नियमांचे काटेकोरपणे पालन व्हायलाच हवे, असे म्हणत आजपर्यंत नागरिकांवर प्रशासनाने ही जबाबदारी टाकली होती. आता नागरिक नियमांकडे दुर्लक्ष करीत असतील तर त्यांच्यावर साथरोग नियंत्रण कायद्याखाली ‘ऑन दि स्पॉट’ गुन्हा दाखल करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. यासाठी मनपा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने आजपासूनच ॲक्टिव्ह मोडवर यावे असेही त्यांनी सांगीतले.
हॉकर्सवर होणार कारवाई
‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत काढण्यात आलेल्या आदेशात कुठेही शहरात हॉकर्सला परवानगी देण्यात आलेली नाही. मुख्य बाजारात आणि गल्ल्यांमध्येही हॉकर्स बसलेले आहेत. सम-विषम नियमात दुकानांना परवानगी आहे. मात्र, हॉकर्स दिशा बदलवून बसू लागले आहे. ही बाब पोलिस अधिकाऱ्यांनीच लक्षात आणून दिली. अशा शहरातील सर्व हॉकर्सवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यावेळी दिले. त्यांनी सांगितले की कुठल्याही वाहनामध्ये अनुज्ञेय संख्येपेक्षा जास्त प्रवासी असल्यास कारवाई करण्यात यावी.
दंडाची रक्कम वाढणार
बाजार परिसरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे दंड आकारण्यात येत होता. आता ही कारवाई अधिक कडक करण्यात येणार आहे. नवा आदेश काढून ही रक्कम वाढवणार असल्याची माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यावेळी बैठकीत दिली. दुकाने सुरू ठेवण्याची वेळ निश्चित केलेली असतानाही रात्री ९ ते १० वाजतापर्यंत दुकाने उघडे राहात असल्याची बाब मनपा आयुक्तांनी सहायक आयुक्त आणि पोलिस उपायुक्तांच्या लक्षात आणून दिली. अशा दुकानांवरही कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.
रात्रीच्या संचारबंदीचीही कडक अंमलबजावणी
शासनाचे दिशानिर्देश आणि स्थानिक पातळीवर काढलेल्या आदेशानुसार रात्री ९ ते सकाळी ५ वाजतापर्यंत शहरात संचारबंदी राहील, असे नमूद आहे. रात्री उशिरापर्यंत नागरिकांचे आवागमन सुरू आहे. यासाठी पोलिसांनी नाकाबंदी करावी, विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करावी, असे निर्देशही मनपा आयुक्तांनी दिले. विलगीकरण केंद्रातला पोलिस बंदोबस्त, प्रतिबंधित क्षेत्रातील आवगमनावरील नियंत्रण पूर्वीसारखे कडक करण्याचे निर्देशही मनपा आयुक्तांनी दिले.
कार्यालयांनाही उपस्थिती संख्येचे बंधन पाळावे
राज्य शासनाने खाजगी कार्यालयात १० टक्के किंवा जास्तीत जास्त १० कर्मचारी अनुज्ञेय केले आहे. तसेच शासकीय कार्यालयात १५ टक्के किंवा जास्तीत जास्त १५ कर्मचारी अनुज्ञेय करण्यात आले आहे. यामधून अत्यावश्यक सेवा देणारे शासकीय कार्यालय जसे आरोग्य विभाग, लेखा विभाग, आपातकालीन व्यवस्थापन, पोलीस, एन.आय.सी., खाद्यान्न आपूर्ति विभाग, महानगरपालिकेची सेवा, एफ.सी.आय, आणि एन.वाय.के. यांना वगळण्यात आले आहे.
लॉकडाऊन हा अंतिम पर्याय : आयुक्त तुकाराम मुंढे
महाराष्ट्रातील इतर शहरांप्रमाणे नागपुरातही लॉकडाऊन व्हावे, ही आपली भूमिका सद्यास्थितीत नाहीच. पण नागरिकांना वेळोवेळी आवाहन करूनही जर त्यांनी नियमांचे पालन केले नाही, शिस्त पाळली नाही तर ‘लॉकडाऊन’च्या पर्यायावरही विचार करावा लागेल असे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मनपा आणि पोलिस प्रशासनासोबतच्या संयुक्त बैठकीत सांगितले. प्रत्येकाने मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टंन्सिंग पाळावे, रात्र संचारबंदीचे पालन करावे, विनाकारण घराबाहेर पडू नये, हॉकर्सने दुकाने थाटू नये, हे नियम जे पाळत नसतील त्यांच्यावर कुठलीही तमा न बाळगता कारवाई करा, असे निर्देश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मनपाचे सहायक आयुक्त आणि पोलिस उपायुक्तांना दिले. आपल्यासाठी मनुष्याचा जीव आणि या शहराचे आरोग्य महत्त्वाचे आहे. यात नागरिकांनी नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी बैठकीच्या माध्यमातून केले.
News Credit To:- NMC