उपराजधानीत होणार पाच कोरोना चाचणी केंद्र !
नागपूर:- राज्यात अकृषक विद्यापीठांमध्ये नांदेड येथील रामनंद तीर्थ विद्यापीठाला करोना चाचणी केंद्रासाठी पहिल्यांदा मान्यता मिळाली. त्यानंतर नागपूर विद्यापीठानेही पुढाकार घेत चाचणी केंद्रासाठी प्रस्ताव पाठविला होता. कोरोना चाचणी प्रक्रियेला गती मिळावी यासाठी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये कोरोना चाचणी सुविधा केंद्र सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, असे प्रस्तावात नमूद होते. यावर आयसीएमआरच्या पथकाकडून नुकतेच विद्यापीठातील प्रयोगशाळेचे निरीक्षण करण्यात आले. यावेळी औषधनिर्माण शास्त्र, सुक्ष्मजीवशास्त्र आणि जीव रसायनशास्त्र या विभागांत तयार करण्यात आलेल्या प्रयोगशाळेचे निरीक्षण करण्यात आले.
कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी सर्वच घटक प्रयत्न करीत असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्येही कोरोना चाचणी केंद्र तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे उपराजधानीमध्ये पाच कोरोना चाचणी केंद्र होणार आहेत. मध्य भारतातील विविध भागांतील करोणा चाचण्या येथे होण्याची शक्यता आहे.
यानंतर आयसीएमआर पथकाने अहवालही तयार केला आहे. विद्यापीठाच्या तयारीवर पथक समाधानी असल्याने लवकरच नागपूर विद्यापीठामध्ये कोरोना चाचणी केंद्र सुरू होण्याची चिन्हे आहेत. सध्या नागपूरात इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, एम्स आणि पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, अशा चार ठिकाणी करोना चाचणी केंद्र सुरू आहेत. या चारही केंद्रांमध्ये विदर्भातून तपासणीसाठी नमूने येत आहेत. त्यात नागपूर विद्यापीठाच्या केंद्राची भर पडल्यास कोरोना चाचणी केंद्रांची संख्या पाच होणार असून मध्य भारतात नागपूर हे कोरोना चाचणीचे मोठे केंद्र होण्याची शक्यता आहे.