समृद्धी महामार्गासाठी केंद्र सरकारच्या तत्त्वांनुसार १.६५ पैसे प्रति किमी दराने टोल आकारणी केली जाणार
मुंबई-नागपूर एकेरी प्रवासासाठी १,१५७ रुपये टोल द्यावा लागणार
मुंबई ते नागपूर रस्ते प्रवासासाठी १५ ते १६ तासांचा कालावधी लागतो
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्पातील नागपूर ते शिर्डी हा ५२० किमी लांबीचा मार्ग डिसेंबर २०२१ पासून वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहे, तर पुढील वर्षी ७०० किमीचा संपूर्ण मार्ग वाहतुकीस खुला होणार आहे. मात्र या मार्गाचा वापर करण्यासाठी वाहनचालक वा प्रवाशांना टोलपोटी १ रुपया ६५ पैसे प्रति किमी दराने शुल्क भरावे लागणार आहे. हा टोलचा दर लक्षात घेता मुंबईहून नागपूरला जाण्यासाठी ७०० किमीच्या एकेरी प्रवासासाठी १,१५७ रुपये मोजावे लागणार आहेत.
मुंबई ते नागपूर रस्ते प्रवासासाठी १५ ते १६ तासांचा कालावधी लागतो. मुंबईहून नागपूरला आठ तासांत पोहोचता यावे यासाठी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाची बांधणी करण्यात येत आहे. या प्रकल्पातील नागपूर ते शिर्डी टप्पा पूर्णत्वाच्या मार्गावर असून डिसेंबरअखेरीस हा टप्पा वाहतुकीत समाविष्ट होणार आहे. या मार्गावरून प्रवास करण्यासाठी किती टोल द्यावा लागेल, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात होता. अखेर ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणा’ने टोलचे दर जाहीर केले आहेत. समृद्धी महामार्गासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार १ रुपया ६५ पैसे प्रति किमी दराने टोल आकारणी केली जाणार असल्याची माहिती ‘एमएसआरडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली.
एकेरी प्रवासासाठी १,१५७ रुपये टोल वा प्रति किमी १ रुपया ६५ पैसे हा दर जास्तच आहे. जरी ही केंद्राची मार्गदर्शक तत्त्वे असली तरी ही आकारणी भरमसाट आहे. त्यामुळे या मार्गाचा वापर कमी केला जाण्याची शक्यता आहे. रेल्वे वा एसटीसाठी जसे सुरुवातीच्या काही किमीसाठी एक दर असतो आणि त्यानंतर पुढच्या अंतरासाठी तो कमी कमी होत जातो, तसा दर टोलसाठी आकारणे गरजेचे आहे, असे टोल अभ्यासक विवेक वेलणकर यांनी सांगितले. या संपूर्ण मार्गावर २६ टोलनाके असणार आहेत. समृद्धी महामार्ग फास्टॅग यंत्रणेने सुसज्ज असणार आहे. लवकरच या मार्गावरील सर्व टोलनाक्यांवर फास्टॅग यंत्रणा बसवण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.
केंद्राच्या २००८ च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार टोल आकारणी करताना मुंबई ते नागपूर एकेरी प्रवासासाठी साधारणत १,१५७ रुपये टोल द्यावा लागेल, अशी माहिती ‘एमएसआरडीसी’चे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली. या संपूर्ण मार्गावरील २४ प्रवेशद्वारांवर २४, तर मार्गाच्या सुरुवातीला नागपूरला एक आणि ठाण्यात एक असे मिळून एकूण २६ टोलनाके असणार आहेत. एकेरी प्रवासासाठी १,१५७ रुपये टोल लागणार असला, तरी जितका किमी प्रवास, तितकाच टोल आकारला जाणार आहे. म्हणजेच एखादी व्यक्ती औरंगाबाद ते नागपूर असा प्रवास करणार असेल, तर किमीप्रमाणे अंदाजे ६७५ रुपये टोल द्यावा लागेल, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.