नागरिकांना मोठा दिलासा! गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे
महाराष्ट्रातील सर्व निर्बंध हटवण्यात आले असून मास्कवरील सक्तीही हटवण्यात आली आहे. त्यामुळे ऐन सणाच्या दिवसांत नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. राज्यात करोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत असताना आता नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, १ एप्रिलपासून करोनासंबंधीचे सर्व निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. यासंबंधी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही माहिती दिली होती. त्यावर अखेर आता मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
गेल्या दोन वर्षापासून राज्यातील डॉक्टर्ससह सर्व फ्रंटलाईन कर्मचारी, एवढेच नव्हे तर सर्व नागरिकांनी कोरोनाशी लढतांना एकमुखाने आणि एकदिलाने राज्य शासनाच्या प्रयत्नांना बळ दिले, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना देखील मन:पूर्वक धन्यवाद दिले. या संपूर्ण काळात राज्यातील विविध जाती-धर्म आणि पंथाच्या नागरिकांनी त्यांच्या सण, उत्सव तसेच समारंभांना देखील मर्यादित ठेवले व संयम पाळला. पोलिस यंत्रणा, पालिका-नगरपालिका, महसूल व ग्रामविकास यंत्रणा आणि एकूणच प्रशासनाने कोरोनाचा दिवस रात्र मुकाबला केला, याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले तसेच सर्वांचे मनापासून आभार देखील मानले.
गुढीपाडव्याआधीच नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल. १ एप्रिलपासून आपत्कालीन कायदा मागे घेण्यात आला आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे करोनाचा धोका होऊ नये यासाठी तुम्ही मास्क घालू शकता. पण मास्कवरील सक्तीही हटवण्यात आली असल्याची माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.