नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गावर किती हजारो कोटींचा खर्च?
मुंबई: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाच्या बांधकामासाठी आतापर्यंत 25,165.34 कोटी रुपये खर्च झाले आहेत. तर समृद्धी महामार्ग प्रकल्पाची अंदाजे रक्कम 55,335.34 कोटी रुपये आहे. 2021-22 या वर्षात हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात 2020-21 मध्ये ही माहिती समोर आली आहे. त्यानुसार समृद्धी महामार्गासाठी एकूण 9,599.99 हेक्टर जमीन आवश्यक आहे. त्यापैकी 8,861.02 हेक्टर जमीन संपादित केली गेली आहे.
डिसेंबर 2020 पर्यंत जमीन संपादनासाठी 7,424.37 कोटी रुपये खर्च झाले आहेत. समृद्धी महामार्गाची लांबी 701 किमी आहे. रुंदी 120 मीटर आहे. हा महामार्ग आठ लेनचा असेल. समृध्दी महामार्ग 10 जिल्हे, 26 तहसील आणि 392 खेड्यांमधून जाईल. यामुळे या महामार्गावर 24 जिल्ह्यांचा समावेश होईल. राज्य व राष्ट्रीय महामार्गांच्या जागेवर 24 कृषी समृध्दी केंद्रे विकसित केली जातील. समृध्दी महामार्गाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर नागपूर ते मुंबई हा प्रवास आठ तासात करता येईल. हा महामार्ग औरंगाबादमधील बुटीबोरी, वर्धा, अमरावती, जालना, चिकलठाणा, शेंद्रा, वाळूज आणि नाशिक या सिन्नर औद्योगिक क्षेत्रास जोडेल. सेवाग्राम, कारंजा (लाड), लोणार, सिंदखेडराजा, वेरूळ, शिर्डी यासारख्या पर्यटन आणि तीर्थक्षेत्रांनाही जोडले जाईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) समृद्धी महामार्ग तयार केला आहे.
औरंगाबादच्या औरिक सिटीमध्ये 5 हजार कोटींची गुंतवणूक: दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडोर अंतर्गत औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी (ऑरिक सिटी) मध्ये 5 हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांची गुंतवणूक झाली आहे. यातून 2,811 रोजगार निर्माण झाले आहेत. विधिमंडळात सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालातून ही माहिती मिळाली आहे. त्यानुसार, ऑरिक सिटीतील 212 एकर क्षेत्राच्या 62 जमीनी गुंतवणूकदारांना वाटप करण्यात आल्या आहेत.