COVID-19:- वाढली “टक्कल’ करण्याची क्रेझ
नागपूर:- लॉकडाऊनमुळे केशकर्तनालये बंद असल्याने मुलांच्याही डोक्यावरील केस वाढले आहेत. त्यामुळे, लॉकडाऊनचा कालावधी संपण्याची वाट न पाहता मुलांचे केस कापण्यासाठी पालकांनीच पुढाकार घेत हातात कात्री घेऊन केस कापण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी यूट्यूब तसेच सोशल मीडियावर केशकर्तनाचे अनेक व्हिडीओ सर्च केले जात आहेत. त्यानुसार, घरीच केस कापून मुलांच्या डोक्यावरील केसांचा भार कमी करण्यात येत आहे. धार्मिक कार्यक्रम किंवा इतर काही प्रसंगात टक्कल केले जाते. मात्र, लॉकडाऊनमुळे सर्रास टक्कल केले जात आहे. तर, काहींच्या वाढलेल्या केसांमुळे त्यांचे लूक बदलल्याचे दिसून येते. अनेकजण आपला नवीन कट फेसबुक, व्हॉट्सऍपवर डीपी म्हणून ठेवत आहेत.
व्यावसायिक आर्थिक अडचणीत
सलून कारागीर व व्यावसायिक लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. उत्पन्न नसल्याने उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकांनी आपल्या दुकानांतून गरीब कारागिरांना रोजगार दिला आहे. पण आता दुकानच बंद असल्याने या कारागिरांचेही हाल सुरु आहेत. शिवाय, दुसरीकडे लॉकडाऊन संपल्यावर कटिंग, दाढी कामातून ग्राहकांशी थेट संपर्क होणार असल्याने त्यावेळी स्वत:चे आरोग्य कसे राखावे, याचीही भीती कारागिरांना आहे. दुकानेच बंद असल्याने व्यावसायिक व कारागिरांपुढे आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. तसेच या व्यावसायिकांना सलूनचे विविध साहित्य पुरविणारे व कैचीला धार लावणारे आणि तत्सम व्यावसायिकांवर देखील आर्थिक संकट ओढावले आहे.
केसांमध्ये विषाणू राहत असल्याचा गैरसमज
नागरिक अनेक दिवसांपासून घरीच असल्याने संकोच न करता टक्कल करीत आहेत. शिवाय, दहा घरांपैकी दोन घरामध्ये ब्युटीपार्लरचे प्रशिक्षण घेतलेल्या महिला आहेत. आपल्या परिवारातील सदस्यांची घरीच दाढी आणि कटिंग या महिला करीत आहेत. तसेच, केसांमुळे कोरोनाचा विषाणू डोक्यामध्ये राहत असल्याचा गैरसमज काही नागरिकांना आहे. या कारणामुळेसुद्धा काही नागरिक टक्कल करीत आहेत.
आपली केशरचना इतरांपेक्षा वेगळी दिसावी, याकरिता तासनतास सलूनमध्ये वेळ घालवणारे तरुण सध्याच्या संचारबंदीच्या काळात घरीच टक्कल करण्याला प्राधान्य देत आहेत. जीवनशैलीचा अविभाज्य भाग असणारे सलून बंद असल्याने नागरिकांची विशेषतः तरुणांची हेअर स्टाइलबाबत घालमेल होत आहे. लॉकडाऊनचा कालावधी संपण्याची वाट न पाहता मुलांचे केस कापण्यासाठी पालकांनीच पुढाकार घेत हातात कात्री घेऊन केस कापण्यास सुरुवात केली आहे
हेअर स्टाइल करून दाखविणार तरी कोणाला, असा प्रश्न अनेकांपुढे आहे. ना ऑफिस, ना कॉलेज, ना कुठले समारंभ, अशी सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे टक्कल करण्यास प्राधान्य दिले जात आहे. विविध कलाकार आणि खेळाडूंप्रमाणे केशरचना करणाऱ्या तरुणांना सध्या घरीच बसून चक्क टक्कलच करावे लागत आहे. असे फोटो व्हॉट्सऍप, फेसबुक, इन्स्टाग्राम आदींवर व्हायरल होत आहेत. एरवी डोक्यावरील केस पूर्ण काढून टाकण्यास सांगितले तर अनेकजण नकार देतात. आकर्षक केशरचनेवर त्यांचा भर असतो.