३-डी इमेज च्या माध्यमातुन कोव्हिड – १९ ची माहिती
कोव्हिडची संपूर्ण माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी, त्याचा उपयोग करून नागरिकांनी कोरोनापासून सतर्क राहावे या उद्देशातून नागपूर महानगरपालिकेने प्रारंभापासूनच तंत्रज्ञानाचा वापर केला. आता एक पाऊल पुढे टाकत कौन्सिल ऑफ सायंटिफिक ॲण्ड इंडस्ट्रीयल रिसर्च अंतर्गत असलेल्या नागपूर येथील नॅशनल एन्व्हिरॉनमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इंस्टिट्यूट अर्थात नीरी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम देहरादूनच्या सहकार्याने नागपूर महानगरपालिकेनी गुगल अर्थ ॲप्लिकेशनचा वापर करीत एक ३-डी डिजीटल सर्विस तयार केली आहे.
तसेच नागपूर स्मार्ट सिटीने एक कोव्हिड – १९ ची माहिती देणारा डॅशबोर्ड तयार केला आहे. याची लिंक मनपाच्या वेबसाईट www.nmcnagpur.gov.in वर उपलब्ध असून या लिंकच्या आधारे नागपुरातील कोव्हिड-१९ ची अद्ययावत माहिती ३-डी मध्ये उपलब्ध होणार आहे. ३-डी वर कोविड संबंधी अद्यावत माहिती देणारी नागपूर महानगरपालिका देशातली बहुदा पहिली ठरली आहे. नागपूर महापालिकेनी नीरी, आई.आई.पी. आणि स्मार्ट सिटी सोबत घेतलेली ही मोठी भरारी आहे.
या सर्विस चे लोकार्पण बुधवारी (ता. १७) मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या हस्ते झाले. यावेळी नीरीचे संचालक डॉ. राकेशकुमार, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, नीरीचे मुंबई झोनल प्रमुख आणि वरिष्ठ मुख्य वैज्ञानिक डॉ. रितेश विजय, प्रकल्प सहायक कौस्तुभ जिचकार व स्मार्ट सिटी चे महाव्यवस्थापक शील घुले उपस्थित होते. आय. आय. पी. चे सुनील पाठक यांचेही यात सहकार्य लाभले.
संगणकाची बटन दाबून मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोव्हिडसंदर्भातील अद्ययावत माहितीसाठी तयार करण्यात आलेल्या ३-डी डिजीटल सर्विस व डॅशबोर्ड चे लोकार्पण केले. याप्रसंगी बोलताना आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करून कोव्हिड संदर्भातील माहिती नागरिकांना सहज उपलब्ध व्हावी, यासाठी मनपा प्रयत्नरत आहे. गुगल अर्थचा वापर करून आता एका क्लिक वर कोव्हिडची माहिती ३-डी इमेजेस मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
देशातील अन्य शहर या पासून प्रेरणा घेऊन कोविड – १९ चा बददल नागरिकांना माहिती देऊ शकतात. ही तर एक सुरुवात आहे. नीरीच्या सहकार्याने मनपा आपली शाळा, उद्याने, कार्यालये इ. ची माहिती अश्या प्रकारे नागरिकांसाठी उपलब्ध करुन देणार आहे. नीरीचे संचालक डॉ. राकेशकुमार म्हणाले, अशा माहितीमुळे नागरिकांच्या ज्ञानात भर पडते. नागरिकांनी प्रशासनाच्या या प्रयत्नाचा वापर करावा.
काय मिळेल माहिती ?
या प्रोग्रामच्या माध्यमातून नागपुरात कोव्हिडचे आजचे रुग्ण किती, ॲक्टिव्ह केसेस किती, प्रतिबंधित क्षेत्र कोणते, प्रतिबंधित क्षेत्राचे इपिसेंटर कोणते, जवळचे कोव्हिड हॉस्पीटल कोणते यासंदर्भातील सर्व माहितीचा ‘रिॲलिस्टीक व्ह्यू’ येथे दिसेल. ३-डी इमेज हा या सर्विसमधील महत्त्वाचा भाग असून यूजर्सला सहज समजेल, अशा पद्धतीने हे तयार करण्यात आले आहे. नागपूरकरांनी याचा अधिकाधिक उपयोग करून कोरोनाचे संक्रमण रोखण्यात मदत करावी, हाच यामागील उद्देश आहे. ही माहिती नागपूर महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या फेसबुक आणि व्टिटर वर पण उपलब्ध राहील.