NMC

बेजबाबदार वागणूकच ठरणार पुन्हा लॉकडाउनसाठी कारणीभूत

कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांना वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र या आवाहनाला अपेक्षेप्रमाणे शहरातील व्यापारी आणि नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नाही. दुकानदारांकडून सम आणि विषम तारखांचे पालन न करणे, मास्कचा वापर न करणे, दुकानांमध्ये गर्दी होउ देणे अशी बेजबाबदार वागणूकच शहरात पुन्हा एकदा लॉकडाउन लावण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे, असा सूचक इशारा महापौर संदीप जोशी यांनी दिला.

कोरोनाच्या संदर्भात नागरिक आणि व्यापा-यांनी नियमांचे पालन करावे यासंदर्भात जनजागृतीसाठी महापौर संदीप जोशी यांनी मंगळवारी (ता.२१) धरमपेठ झोन अंतर्गत बाजाराचा दौरा केला. यावेळी त्यांच्या सोबत धरमपेठ झोन सभापती अमर बागडे, नगरसेवक सुनील हिरणवार, नगरसेवक प्रमोद कौरती, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, अंबाझरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय करे, व्यापारी आघाडीचे तुषार कोठारी, अजय शर्मा, गोपाल बावनकुळे, सागर जाधव, विजय डोंगरे, योगेश पाचपोर, मनोज पोद्दार आदी उपस्थित होते.

शंकरनगर चौकातून महापौरांनी दौ-याला सुरूवात केली. वेस्ट हायकोर्ट रोड, लक्ष्मीभूवन चौक, गोकूलपेठ बाजार, रामनगर परिसर या संपूर्ण भागात फिरून महापौर संदीप जोशी यांनी कोव्हिड-१९ संदर्भात शासनाने दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करण्याचे आवाहन केले. दुकानांसंदर्भात सम आणि विषम तारखांच्यांच्या नियमांचे पालन करणे, मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याचेही आवाहन यावेळी करण्यात आले. कोव्हिड-१९ चा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने स्वत:सह इतरांच्या आरोग्याचा विचार करून सर्व नियमांचे पालन करावे. अन्यथा लॉकडाउनला सामोरे जावे, असा इशारा महापौर संदीप जोशी यांनी दिला आहे.

नियमांचे उल्लंघन करणा-या दोन दुकानांवर कारवाई

जनजागृती दौ-यादरम्यान महापौरांव्दारे नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत असतानाच लक्ष्मीभूवन चौकातील मंगलकर ज्वेलर्स येथे ग्राहकांची गर्दी दिसून आली. कोणत्याही प्रकारचे शारिरीक अंतर राखले जात नसल्याचे दिसून येताच महापौर संदीप जोशी यांनी स्वत: ज्वेलर्सच्या दुकानात जावून नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले व नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल सदर मालकाकडून दंड वसूल करण्याचे निर्देश उपद्रव शोध पथकाला दिले.

याशिवाय गोकुलपेठ ते राम नगर मार्गावरील दुकानांच्या ओळीत सम व विषम तारखांचे उल्लंघन करून तसेच फुटपाथवर अतिक्रमण करून दुकान पुढे आणलेल्या मिल्टन गिफ्ट अँड टॉय शॉपवरही कारवाई करण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी दिले. महापौरांच्या निर्देशानुसार पथकाद्वारे दोन्ही आस्थापनांकडून पाच हजार रुपये दंड वसूल केला. तसेच फुटपाथवर असलेले मिल्टन गिफ्ट अँड टॉय शॉपचे साहित्यही जप्त केले.

Team Nagpur Updates

Nagpur Updates is your local/Digital news, entertainment, Events, foodies & tech website. We provide you with the happening news, Page3 Contain and all about Nagpur Foodies & Infrastructure from the Nagpur and world.

Related Articles

Back to top button

Adblock Detected

Disable Your Add Block To View Page.