कोराडी: ९० मीटर उंचीची चिमणी केली जमीनदोस्त
कोराडी औष्णिक वीज केंद्रात कडक सुरक्षेत केंद्राच्या बंद झालेल्या युनिट क्रमांक ५ ची ९० मीटर उंचीची चिमणी जमीनदोस्त करण्यात आली. या प्रक्रियेला ३ तासांचा कालावधी लागला, परंतु चिमणी काही सेकंदांतच जमीनदोस्त झाली. २०० मेगावॅट क्षमतेचे हे युनिट १९७८ मध्ये सुरु झाले होते.
कालावधी पूर्ण झाल्यानंतर सन २०१७ मध्ये हे युनिट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच २१० मेगावॅट क्षमतेचे युनिट क्रमांक ६ आणि ७ सुद्धा याच कारणामुळे बंद करण्यात आले. यापैकी युनिट क्रमांक ५ ला स्क्रॅप (भंगारात) मध्ये लिलाव करण्याचा निर्णय घेऊन याचे कंत्राट चिन्नर स्टील कोलकाताला ७८ कोटींत देण्यात आले. यात चिमणी पाडण्याचा समावेश होता. मंगळवारी दुपारी या कामात तज्ज्ञ मानण्यात येणाऱ्या दिल्लीच्या एका कंपनीने चिमणी पाडण्याची प्रक्रिया सुरू केली. जवळपास दोन तास चिमणीचा एकीकडील भाग दोन पोकलेनच्या माध्यमातून कापण्यात आला. सायंकाळी ५.३० वाजता पाहता पाहता चिमणी जमीनदोस्त झाली.