लॉकडाऊन करा, मात्र लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन.. !
‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत राज्य शासनाने अनेक बाबीत शिथिलता दिली. मात्र त्याबरोबरच दिशानिर्देशांचे पालन करण्याचे बंधन घातले. नागपूरकरांनी या गोष्टीला तिलांजली देत नियमांचे उल्लंघन केले. त्यामुळे पुन्हा ‘लॉकडाऊन’ करण्याच्या आयुक्तांनी दिलेल्या इशाऱ्याला आपले समर्थन आहे. फक्त निर्णय घेताना या शहरातील सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे, अशी विनंतीवजा सूचना महापौर संदीप जोशी यांनी केली आहे.
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काल एक व्हिडिओ प्रसारित करून नागरिकांनी नियम पाळले नाही तर नागपुरात संचारबंदी लागू करावी लागेल असा इशारा दिला. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर नागपुरात नागरिकांनी नियम पाळले नाहीत. त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ झाली, हे वास्तव आहे. आयुक्तांच्या या मताशी आपण पूर्णतः सहमत आहोत. नागरिकांना जी सूट देण्यात आली त्याचा गैरफायदा घेत सर्रास नियमांचे उल्लंघन केले जात आहे. घालून दिलेले नियम पायदळी तुडविले जात आहे. त्यामुळे नागपुरातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या रुग्णसंख्येवर आळा घालण्यासाठी संचारबंदीसारखा निर्णय स्वागतार्ह आहे.
पण या निर्णयाने कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांचे मोठे नुकसान होणार आहे. याची चाचपणी करण्यासाठी आयुक्तांनी माझ्यासोबत शहराचा संयुक्त दौरा करावा. जे व्यापारी नियम पाळत नाहीत अशा बाजारपेठामध्ये महापौर आणि आयुक्त संयुक्तरित्या फिरल्यास त्यातून एक वेगळा संदेश जाईल. परिणामही होईल. यामुळे कदाचित समचारबंदी लागू करण्याची वेळही येणार नाही. याउपरही परिस्थिती जर आटोक्याबाहेर जात असेल तर निश्चितच संचारबंदीचा निर्णय घ्यायला हवा.
परंतु हा निर्णय घेताना मनपा आयुक्तांनी या शहरातील खासदार, आमदार, मनपा पदाधिकारी यांच्यासह जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासनाला विश्वासात घ्यावे. संचारबंदीचे नियम काय असतील यावर साधकबाधक चर्चा व्हायला हवी. कारण कुठलीही अडचण आली तर नागरिक सर्वप्रथम लोकप्रतिनिधीकडे येतो. नागरिकांची नस जनप्रतिनिधींना माहिती आहे. संचारबंदी जाहीर करण्यापूर्वी जनजागृती करावी. या कुठल्याही प्रयत्नांचा परिणाम झाला नाही तर नक्कीच संचारबंदी जाहीर करावी, आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून पूर्णपणे प्रशासनाच्या सोबत राहू, असेही महापौर संदीप जोशी यांनी म्हटले आहे.