LPG कमर्शियल सिलेंडरच्या किमतीत 91.50 रुपयांनी कपात
महागाईचा सामना करत असलेल्या सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सरकारी तेल कंपन्यांनी व्यवसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंटमधील जेवण स्वस्त होण्याची शक्यता आहे. सिलिंडरचे नवे दर आजपासून लागू झाले आहेत. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. गेल्या महिन्यात घरगुती वापराचा सिलिंडर ५० रुपयांनी महागला होता. आता मात्र १४.२ किलोच्या सिलिंडरचे दर जैसे थेच ठेवण्यात आले आहेत.
सरकारी मालकीच्या इंधन किरकोळ विक्रेत्यांनी गुरुवार, 1 सप्टेंबर रोजी एका अधिसूचनेत म्हटले आहे की, 19 किलो LPG सिलिंडरच्या किमती 91.50 रुपयांनी कमी केल्या आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या वेबसाइटनुसार नवीन किमती आजपासून लागू झाल्या आहेत. यासह, व्यावसायिक सिलिंडरची किंमत आधीच्या 1,976.50 रुपयांवरून 1,885.00 रुपयांवर घसरली आहे.