विलगीकरण केंद्रात उत्तमोत्तम व्यवस्था करा!

पाचपावली विलगीकरण केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबतच मनपाचे अधिकारी-कर्मचारी, पोलिस प्रशासन तेथे विलगीकरणात असलेल्या नागरिकांची कुटुंबातील सदस्यांप्रमाणे काळजी घेत आहे, हे बघून समाधान वाटले. यापेक्षाही उत्तम व्यवस्था व्हावी, यासाठी प्रयत्न करा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी अधिकाऱ्यांना दिले. तर व्यवस्थेत असलेल्या सर्व वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या चमूचे, मनपा प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाचे कौतुक केले.

कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर नागपुरात कोरोनाची साखळी खंडित व्हावी, विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी जे रुग्ण पॉझिटिव्ह येतात त्यांच्या संपर्कातील प्रत्येक व्यक्तीला संस्थांत्मक विलगीकरण केंद्रात पाठविण्यात येते. १४ दिवस त्यांना तेथे ठेवण्यात येते. यादरम्यान त्यांचे दोन वेळा स्वॅब घेण्यात येते. दोन्ही वेळेचा अहवाल निगेटिव्ह आला तर त्यांना घरी पाठविण्यात येते. पॉझिटिव्ह आला तर रुग्णालयात आयसोलेशनमध्ये ठेवून त्यांच्यावर उपचार केले जातात.

शहरातील अशा विलगीकरण केंद्रापैकी पाचपावली पोलिस क्वार्टर हे एक विलगीकरण केंद्र आहे. येथे विलगीकरणात असलेल्या नागरिकांशी चर्चा करण्यासाठी आणि तेथील व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी मंगळवारी (ता. ३०) सकाळी पाचपावली पोलिस क्वार्टर विलगीकरण केंद्राला भेट दिली आणि येथील संपूर्ण व्यवस्था, वैद्यकीय चमूतर्फे रुग्णांची होणारी देखरेख, त्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी आदींबद्दल समाधान व्यक्त केले.

यावेळी त्यांच्यासोबत उपमहापौर मनीषा कोठे, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, मनपाचे आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार, इब्राहिम टेलर, नगरसेविका मंगला लांजेवार, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ. प्रदीप दासरवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई, आशीनगर झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, कार्यकारी अभियंता राजेश भूतकर, सोनाली चव्हाण, उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे, पाचपावली विलगीकरण केंद्राचे इंसिडंट कमांडर डॉ. श्रीकांत टेकाडे, डॉ. मिनाक्षी सिंग आदी उपस्थित होते.

पाचपावली विलगीकरण केंद्रात असलेल्या व्यक्तींविषयी, तेथील क्षमता, सोयी आदींविषयी अतिरिक्त आयुक्त राम जोशी आणि डॉ. मिनाक्षी सिंग यांनी माहिती दिली. ६२५ व्यक्तींची क्षमता या केंद्रात असून सध्या २७५ व्यक्ती विलगीकरणात आहेत. त्यापैकी ४५ व्यक्तींना मंगळवारी घरी पाठविण्यात येणार आहे. आजपर्यंत या केंद्रात एकूण २७४० व्यक्तींचे विलगीकरण करण्यात आले होते. त्यापैकी ४२२ व्यक्ती पॉझिटिव्ह निघालेत. हे व्यक्ती विलगीकरणात असल्यामुळेच त्यांच्यामुळे इतरत्र विषाणूचा प्रसार झाला नसल्याचेही डॉ. मिनाक्षी सिंग यांनी सांगितले.

यानंतर महापौर संदीप जोशी यांनी संपूर्ण विलगीकरण कक्षाची पाहणी केली. तेथे असलेल्या काही लोकांची आस्थेने विचारपूस केली. आपल्याला जर काही त्रास होत असेल तर हक्काने सांगा. येथे उत्तमोत्तम व्यवस्था देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. कुटुंब म्हणूनच येथे आपला वावर असावा. येथील व्यवस्था जर खरंच चांगली आहे, असे आपल्याला वाटत असेल तर येथून निघून यापुढे

त्यासंदर्भात लोकांना सांगा, जेणेकरून विलगीकरणाबाबत जे काही लोकांमध्ये गैरसमज असतील, ते दूर होतील. विशेष म्हणजे येथील सर्व व्यवस्थेवर, नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या भोजन व अन्य सेवेवर बारिक लक्ष ठेवा. कुठल्याही त्रुट्या राहता कामा नये, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी यावेळी दिले.

संपूर्ण चमूचे केले कौतुक

विलगीकरण केंद्रात जे अधिकारी-कर्मचारी सेवा देतात, त्यांचे कार्य खरंच कौतुकास पात्र आहे. हीच खरी समाजसेवा असलेल्या गौरवोद्‌गार महापौर संदीप जोशी यांनी त्यांच्याबद्दल काढले. आज आपण देत असलेली सेवा हे जरी आपले कर्तव्य आणि जबाबदारी असली तरी आजच्या काळात ते कार्य लाख मोलाचे आहे. या कार्याची निश्चितच दखल घेतली जाईल. जनतेप्रती केलेल्या सेवेबद्दल नागपूर महानगरपालिका सदैव आपली ऋणी राहील, या शब्दात त्यांनी वैद्यकीय चमू, मनपा आणि पोलिस प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव केला.

स्वयंप्रेरणेने सेवा

कोरोनाच्या काळात सेवा देण्यासाठी अनेक सेवाभावी व्यक्ती, संस्था स्वयंप्रेरणेने समोर आला. यासंदर्भात माहिती देताना अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले की नॅशनल इंस्टिट्युट ऑफ वुमन ॲण्ड चाईल्ड येथे प्रशिक्षण घेणारे २५ विद्यार्थी स्वत:हून सेवेसाठी समोर आले. मनपाने त्यांच्या सेवेला हिरवी झेंडी दिली. एचसीएलने यासाठी संबंधित संस्थेला आर्थिक मदतही पुरविली. या विद्यार्थ्यांचे प्राथमिक प्रशिक्षण घेऊन प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांना विविध विलगीकरण केंद्रावर नियुक्त करण्यात आले. हे विद्यार्थी आजही अविरत आपली सेवा देत आहेत.

असे एक दंतचिकित्सक स्वयंप्रेरणेने सेवा देत असून स्वॅब घेण्याचे कार्य करीत आहे. आजपर्यंत सुमारे दोन हजारांवर स्वॅब त्यांनी घेतल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी महापौर संदीप जोशी यांना दिली. स्वयंप्रेरणेतून नागपूर शहराला सेवा देणाऱ्या अशा सर्व व्यक्तींचे महापौर संदीप जोशी यांनी आभार मानले आणि त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

Published by

Nagpur Updates

Nagpurupdates is your local/Digital news, entertainment, Events, foodies & tech website. We provide you with the happening news, Page3 Contain and all about Nagpur Foodies & Infrastructure from the Nagpur and world.

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Exit mobile version