महापौरांनी मानले नागपूरकरांचे आभार

नागपूर महानगरपालिकेतर्फे वारंवार करण्यात आलेल्या आवाहनाला नागपूरकर जनतेने भरभरून प्रतिसाद दिला. यंदा सार्वजनिकरित्या गणेशोत्सव साजरा न करणे, चार फुटांपेक्षा जास्त उंचीची मूर्ती ठेवू नये तसेच गणेश मूर्तींचे विसर्जन प्राधान्याने घरीच करण्याचे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले होते. नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येणा-या या आवाहना नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. अनंत चतुर्दशीला अनेक नागपूरकरांनी घरीच विघ्नहर्त्या गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करून आपल्या जबाबदारपणाची प्रचिती दिली. या संकटप्रसंगी नागपूरकर जनतेने दाखविलेली सामंजस्याची भूमिका कौतुकास्पद असून शहराचा प्रथम नागरिक या नात्याने समस्त नागपूरकरांचे आभार मानतो, अशा शब्दांत महापौर संदीप जोशी जनेतेच्या सहकार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
मंगळवारी (ता.१) महापौर संदीप जोशी यांनी शहरातील विसर्जनस्थळी भेट देउन परिस्थितीचा आढावा घेतला. शहरातील फुटाळा, गांधीसागर आणि सक्करदरा तलाव परिसरातील कृत्रिम टँकची व्यवस्था केलेल्या विसर्जनस्थळाची पाहणी केली. याप्रंसगी स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले, पोलिस उपायुक्त विनीता शाहू, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन डॉ. प्रदीप दासरवार, पोलिस निरीक्षक राघवेंद्रसिंग क्षीरसागर आदी उपस्थित होते.
महापौरांनी सर्वच ठिकाणी सेवाकार्य बजावणा-या मनपाच्या कर्मचा-यांसह, पोलिस कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसोबत यावेळी संवाद साधला. फुटाळा तलावात सेवा देत असलेल्या ग्रीन व्हिजील फाउंडेशन आणि मर्चंट नेव्ही ऑफीसर्स वेलफेअर असोसिएशनच्या स्वयंसेवकांकडूनही महापौर संदीप जोशी यांनी आढावा घेतला. शहरातील विसर्जनस्थळी मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी अत्यंत कमी प्रमाणात गणेश मूर्ती विसर्जीत करण्यात आल्या आहेत. परिसरात येणारे प्रत्येक नागरिक नियमांचे पालन करूनच येत आहेत. प्रत्येक जण स्वत:ची काळजी घेत असल्याची माहिती फुटाळा तलाव परिसरात सेवाकार्य बजावत असलेल्या ग्रीन व्हिजील फाउंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी यांनी दिली. फुटाळा तलाव परिसरातील विसर्जन स्थळी ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या स्वयंसेवकांमार्फत पर्यावरणपूरक गणेशोत्सव व कोरोना संबंधी जनजागृती करणारे संदेशाचे फलक दर्शविण्यात आले होते. ग्रीन व्हिजीलचे कौस्तभ चॅटर्जी यांच्यासह सुरभी जायस्वाल, मेहुल कोसुरकर, विष्णूदेव यादव, शीतल चौधरी, नम्रता जवेरी, विकास यादव आदी स्वयंसेवकांनी मंगळवारी (ता.१) सकाळपासून विसर्जन पूर्ण होईपर्यंत सेवाकार्य बजावले.
दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी शहरात २५० कृत्रिम टँक कमी लावण्यात आल्या आहेत. मात्र यानंतरही कोणत्याही स्थळी विसर्जनासाठी नागरिकांची गर्दी दिसत नाही. हा नागपूरकर जनतेद्वारे मिळालेला सामंजसपणाचा संदेश आहे. अशीच खबरदारी आपण पुढेही घेत अनावश्यक गर्दी टाळण्याची तत्परता दाखविल्यास लवकरच कोरोनाला हद्दपार करू, असा विश्वासही यावेळी महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केला.
दुर्गोत्सवातही नियमांचे पालन व्हावे
गणेशोत्सवानंतर सर्वत्र दुर्गोत्सवाची तयारी केली जाणार आहे. कोरोनाच्या या संकटकाळात सर्वच उत्सव साजरे करताना काळजी घेणे आवश्यक आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच दुर्गोत्सवही सार्वजनिकरित्या साजरा करण्याचे टाळण्यात यावे. उत्सव साजरा करताना मूर्तीची उंची चार फुटांपेक्षा जास्त असू नये, याची काळजी घ्यावी. एकूणच गणेशोत्सवाप्रमाणेच दुर्गोत्सवातही सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जावे, असे आवाहनही महापौर संदीप जोशी यांनी केले.