देशात पहिल्यांदाच रेल्वे मार्गावर मेट्रो धावणार: इतर शहरांस जोडण्याच्या प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
नागपूर: देशात आतापर्यंत आपण मेट्रो स्वत: च्या मार्गावर धावताना पाहिले आहे. पण नागपुरात प्रथमच मेट्रो रेल्वेच्या मार्गावर धावताना दिसणार आहे. कारण महाराष्ट्र राज्य सरकारने ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्पाला मान्यता दिली आहे. या प्रकल्पातून नागपूर आसपासच्या शहरांशी जोडले जाईल.
राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी या प्रकल्पाला मंजुरी दिली. नरखेड, वर्धा, भंडारा, रामटेक ही शहरे 333 कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून नागपूर महानगरासमवेत जोडली जातील. या नवीन प्रकल्पाचा पहिला टप्पा 2031 मध्ये पूर्ण होईल असा दावा केला जात आहे.
उल्लेखनीय असे की या संदर्भात, 2018 रोजी सामंजस्य करार झाला होता. बुधवारी हा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आला. हा प्रकल्प महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार आणि महामेट्रो यांच्या संयुक्त विद्यमाने साकारला जाईल. ‘केएफडब्ल्यू’ नावाच्या संस्थेकडून यासाठी कर्ज घेण्याचे ठरल्यानंतर त्याची जबाबदारी महामेट्रोवर टाकण्यात आली आहे. याचा फायदा नागपूर ते नरखेड, वर्धा, रामटेक आणि भंडारा या शहरांत आवागमन करणार्या प्रवाशांना होणार आहे. पहिला टप्पा 2021 मध्ये सुरू होईल आणि 2031 मध्ये पूर्ण होईल. दुसरा टप्पा 2031 नंतर सुरू होईल.
हे असतील नवीन मार्ग: या प्रकल्पांतर्गत नागपूर-नरखेड 85.53 कि.मी., नागपूर-वर्धा. 78.8 किमी, नागपूर-रामटेक 41.6 किमी व नागपूर-भंडारा 62.7 किमी मार्ग बनविण्यात येतील. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, महामेट्रो प्रकल्पामुळे नरखेड व काटोल परिसरच्या विकासाला वेग येईल. अनेक वर्षांपासून नागपूरला मेट्रोमार्गे अन्य शहरांशी जोडण्याची मागणी होत होती. या संदर्भात त्यांनी अनेकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली होती. आज हा प्रयत्न यशस्वी झाला.
ट्रेनचा वेग 120 किमी प्रती तास असेल: यात सर्व सुसज्ज आधुनिक कोच असतील. सुरुवातीला नागपूरला चार ठिकाणाहून जोडण्यासाठी चार गाड्या दिल्या जातील आणि हळूहळू त्या वाढतील आणि ठराविक अंतराने त्या आठपर्यंत जातील.
राज्य सरकार आणि भारतीय रेल्वेचे आभार: ब्रॉडगेज मेट्रोचा प्रस्ताव पुढे नेण्यात भारतीय रेल्वेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्प मंजूर झाल्याबद्दल महा मेट्रोने भारतीय रेल्वे व महाराष्ट्र सरकारचे आभार मानले आहेत.