नागपूरचे आयुक्त तुकाराम मुंढेंची डोकेदुखी यामुळे वाढली.
नागपूर:- शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येने शंभरी गाठली. यात सतरंजीपुरा येथील मृत कोरोनाबाधितांच्या संपर्कातील 60 टक्के रुग्ण आहेत. महापालिकेने या परिसरात पुन्हा सर्वेक्षण सुरू केले. याशिवाय कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या प्रत्येक भागात दररोज 83 हजार नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.
सर्वेक्षण करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना नागरिक माहितीच देत नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही याबाबत वेळोवेळी चिंता व्यक्त केली.
कोरोनाबाधितांच्या संपर्कातील नागरिक अद्यापही संपर्काबाहेर असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. महापालिकेने वारंवार आवाहनही करूनही कोरोनाबाधित व्यक्तींच्या भागातील नागरिक स्वंयस्फूर्तीने माहितीसह पुढे येत नसल्याचे एका अधिकाऱ्याने नमुद केले. महापालिकेच्या डोळ्यात धूकफेक करतानाच नागरिक स्वतःसह कुटुंबियांचाही जीव धोक्यात घालत असल्याचे चित्र आहे.
एखाद्या भागात कोरोनाबाधित आढळल्यास महापालिका त्याच्या कुटंबीयांसह परिसरातील नागरिकांनाही विलगीकरणात पाठवत आहे किंवा घरीच 14 दिवस विलगीकरणात ठेऊन त्यांच्यावर लक्ष ठेवत आहे. अनेक नागरिक त्यांच्या वैयक्तिक कामामुळे विलगीकरणात जाण्याचे टाळत असून महापालिकेपासून माहितीही लपवित असल्याचे एका कर्मचाऱ्याने नमुद केले.
मृत कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांच्या संपर्कातील नागरिक अजूनही महापालिका प्रशासनापासून दूरच आहे. एका नागरिकामुळे सहाशे ते हजार नागरिकांना कोरोनाची बाधा होत असल्याचे आयुक्तांनीच स्पष्ट केले. मात्र, त्या तुलनेत शहरातील विलगीकरण केंद्रात 694 तर घरीच विलगीकरणात 502, असे एकूण 1196 जण आहेत.
त्यांच्या संपर्कातील काहींना विलगीकरणात ठेवले. परंतु या भागातील नागरिक माहिती देत नसल्याचीही बाब पुढे आली असून नागरिक बिनधास्त बाहेरही फिरत आहेत. त्यामुळेच आमदार कृष्णा खोपडे यांनी या भागात सैन्यबळ लावण्याची मागणी केली होती.
वस्त्यांतील नागरिकांचे मॉर्निंग वॉक सुरूच
शहरात अजूनही कोरोनाबाधितांच्या संपर्कात अप्रत्यक्ष आलेले नागरिक फिरत आहेत. त्यांना ओळखणेही कठीण असून ते स्वतःही माहिती देत नसल्याने महापालिका प्रशासनापुढे नवे संकट उभे ठाकले आहे. अनेक वस्त्यांमधील नागरिक मॉर्निंग वॉकला दिसून येतात. त्यामुळे रस्त्यांवर चांगलीच वर्दळ असून कोरोनाबाधिताच्या संपर्कातील व्यक्तीच्या संपर्कात आलेलेही रस्त्यांवर असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून पुढे येण्याचे अनेकदा आवाहन केले. परंतु त्यांच्या आवाहनाला अल्प प्रतिसाद आहे. एवढेच नव्हे सतरंजीपुरा, मोमीनपुरा, शांतीनगर, बैरागपुरा, भालदारपुरा असे कोरोनाचे लोन पसरले आहे. सतरंजीपुऱ्याने कहर केला असून येथे मोठ्या संख्येने बाधित आहेत.