दक्षिण-पश्चिम नागपूरमधील झोपडपट्टीधारकांवर कारवाई करु नये -फडणवीसांचे निवेदन
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन दिल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी तत्काळ हे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या या आदेशामुळे हजारो झोपडपट्टीधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील काही भागातील झोपडपट्टीधारकांना दिलेल्या नोटीसांसंदर्भात कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये, असे निर्देश रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नागपूरच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना दिले आहेत.
रामबाग, इंदिरानगर, ताटतरोडी, सरस्वतीनगर, तकिया परिसरातील 50 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांना नागपूर महापालिकेकडून मालकी हक्काचे पट्टे देण्यात आले आहेत. ही जागा नासुप्रची असल्याने रेल्वेने दिलेल्या नोटीसा मागे घेण्यात याव्यात, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी 22 एप्रिल रोजी नागपुरात रेल्वे अधिकार्यांना भेटून केली होती. ही कारवाई तत्काळ मागे घेण्यासंदर्भात नागपुरात 22 एप्रिल रोजी रेल्वे अधिकार्यांची भेट घेतली होती. त्यानंतर अलिकडेच रेल्वेमंत्री मुंबईच्या दौर्यावर असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्र्यांना अधिकृतपणे निवेदन देत या नागरिकांची व्यथा मांडली.
यावेळी या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यानंतर रेल्वेमंत्र्यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना लगेच दूरध्वनी करून कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश दिले. सर्वांच्या कागदपत्रांची पुन्हा नीट पडताळणी करावी आणि तोवर कोणतीही कारवाई करू नये, असेही त्यांनी सांगितले.