यापुढे निवडणुक लढवणार नाही: संदीप जोशी
नागपूर: शहराचे महापौर संदीप जोशी नेहमी चर्चेत असतात. अगदी प्रारंभीचे त्यांचेवर गोळीबाराचे प्रकरण असो तर कधी त्यांच्या निर्णयांमुळे तर कधी आयुक्त मुंढेसोबतच्या संघर्षामुळे. मात्र आता जोशी वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहे. काल (ता. २०) संदीप जोशी यांचा वाढदिवस होता. वाढदिवसाआधीच फक्त डिजिटल शुभेच्छांचा स्विकार करू असे त्यांनी बजावले होते, पण त्याहीपुढे वाढदिवसानिमित्त त्यांनी आगळीच भुमिका घेतलीय, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी काल चाहत्यांशी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यादरम्यान एका कार्यकर्त्याने, “आपण चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आला आहात. यापुढे आपण पुन्हा निवडणूक लढवणार की सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडणुकीची संधी द्याल?” असा सवाल केला. त्यावर उत्तर देताना महापौर जोशी यांनी, “प्रश्न अत्यंत वास्तविक आणि खरा असल्याचे प्रतिपादन केले. अनेकदा नेत्यांनीच लढायचं आणि कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्याच उचलत राहायचं हे बरोबर नाही. मला वाढदिवसानिमित्त तुम्ही शुभेच्छा दिल्या आणि हा प्रश्नदेखील विचारलात. त्यामुळे वाढदिवसाच्या दिवशी आज मी कॅमेऱ्यासमोरच जाहीर करतोय की, यानंतर मी महापालिकेची निवडणूक लढवणार नाही. माझ्यानंतरचा जो कुणी कार्यकर्ता असेल, जो पक्षासाठी मेहनत करतोय, तो कार्यकर्ता माझ्या जागेवर लढेल. मी त्याचं काम करेन. पण यापुढे महापालिकेची कोणतीही निवडणूक लढवणार नाही.”
जोशी यांच्या या निर्णयामुळे अनेक लोक अचंभित आहेत, राजकीय वातावरणही ढवळून निघाले आहे. काहींनी या निर्णयाचे कौतुक केले तर काहींनी हा निर्णयाची वेळ चुकीची असे मत व्यक्त केले आहे. काही का असेना! असे जाहिर करण्यासही धैर्य असावे लागते. महापौरांचा हा निर्णय चुक की बरोबर हे तर काळच ठरवेल, तुर्त विद्यमान जवाबदा-्यांस ते कसे पार पाडतात याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.