समस्या नव्हे, ही तर संधी…!
कुठल्याही कठीण प्रसंगाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, यावर त्या प्रसंगातून निघणारे मार्ग आणि मिळणारा निकाल अवलंबून असतो. कोव्हिड-१९ आणि त्या पार्श्वभूमीवर सुरू झालेले लॉकडाऊन हा प्रत्येक व्यक्ती आणि संस्थेसाठी कठीण प्रसंग होता आणि आहे. मात्र या कठीण प्रसंगाकडे नागपूर महानगरपालिकेने संधी या दृष्टीकोनातून बघितले आणि आरोग्य सेवेचा कायापालट करून संकटरुपी संधीचे सोने केले. ही संधी हेरून नागपूर महानगरपालिकेने पाच रुग्णालयांचा क्षमता वाढीसोबतच केलेला कायापालट विस्मयकारक आहे. अवघ्या 45 दिवसात ही किमया घडली. कुठल्याही खासगी रुग्णालयांना आणि कॉर्पोरेट कार्यालयांना लाजवेल, असे या रुग्णालयांचे रूप पालटले आहे.
इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, आयसोलेशन हॉस्पिटल इमामवाडा आणि पाचपावली स्त्री रुग्णालय पाचपावली या तीन रुग्णालयांचा पूर्णतः कायापालट झालेला आहे. के.टी. नगर रुग्णालय आणि आयुष हॉस्पिटल, सदर ही दोन रुग्णालये नव्याने तयार करण्यात आली आहेत.
ही पाचही रुग्णालये मिळून एकूण ४५० बेड्स असलेल्या या रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रत्येक बेडला सेंट्रल ऑक्सिजन आणि सेंट्रल सक्शनची सोय आहे. ४५० बेड्सपैकी इंदिरा गांधी रुग्णालय, पाचपावली स्त्री रुग्णालय आणि के.टी. नगर हॉस्पिटलमध्ये ५० बेड्सचा अतिदक्षता विभाग आहे.
के.टी. नगर आणि सदरचे आयुष हॉस्पिटल वगळता अन्य तीन रुग्णालयातील 300 बेड्स सेवेसाठी सज्ज झाले आहेत. पुढील सात दिवसात उर्वरीत १५० बेड्सही सज्ज होतील. लॉकडऊनच्या काळात संधी समजून या रुग्णालयांचा केलेला कायापालट हा केवळ आणि केवळ नागरिकांच्या सेवेसाठीच आहे. आम्ही केवळ बदलावर नाही तर संपूर्ण परिवर्तनावर विश्वास ठेवतो. हे परिवर्तन आपल्यासाठी आहे. नागरिकांनी ह्या सेवेचा लाभ घ्यावा आणि परिवर्तनाच्या मोहिमेत सहभागी व्हावे.