नागपुरात निवडणुकीच्या आदल्या दिवशी काँग्रेसनं बदलला उमेदवार…
विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना काँग्रेसवर उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढावली आहे. काँग्रेसनं छोटू भोयर यांच्या ऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसं पत्रक काँग्रेसकडून काढण्यात आलं आहे.
नागपूर : विधान परिषद निवडणुकीच्या (Legislative Council Election) पार्श्वभूमीवर नागपुरात मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना काँग्रेसवर (Congress) उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढावली आहे. काँग्रेसनं छोटू भोयर (Chotu Bhoyar) यांच्या ऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख (Mangesh Deshmukh) यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसं पत्रक काँग्रेसकडून काढण्यात आलं आहे. उमेदवार बदलाबाबत मागील दोन दिवसांपासून चर्चा सुरु होती. त्यानंतर आज अखेर काँग्रेसनं आपला उमेदवार बदलला आहे.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवार बदलण्याचा प्रस्ताव हायकमांडकडं पाठवण्यात आला होता. त्यानंतर दिल्लीतून या निर्णयाला मंजुरी दिली. छोटू भोयर ताकदीने निवडणूक लढत नसल्याचा काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा आरोप होता. त्यामुळे उमेदवार बदलण्याचा प्रस्ताव पाठवल्याचं काँग्रेसच्या गोटात बोललं जातं होतं. अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना समर्थन देण्यावर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचं एकमतही झालं होतं. मात्र, छोटू भोयर यांनी या सर्व चर्चेचं खंडण करत, मीच काँग्रेसचा उमेदवार असून, उमेदवार बदलाचा कुठलाही प्रस्ताव हायकमांडकडं गेला नसल्याचा दावा केला होता.
काँग्रेसचं पत्रक काय?
नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने पक्षाकडून डॉ. रविंद्र भोयर यांना उमेदवारी जाहीर केली होती. या निवडणुकीसाठी उद्या दि. 10 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. मात्र, आता निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात डॉ. रविंद्र भोयर यांनी ही निवडणूक लढवण्यासाठी असमर्थता दर्शविल्याचं समजतं. त्यामुळे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मान्यतेनं तसंच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार मंगेस सुधाकर देशमुख यांना काँग्रेस पक्षाकडून पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे. तरी या निवडणुकीतील मतदान करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या सर्व सदस्यांना तसंच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना या संदर्भात माहिती देण्यात यावी, असं पत्रक काँग्रेसकडून काढण्यात आलं आहे.
विजय काँग्रेसच्या उमेदवाराचा होणार – केदार
नागपूर विधान परिषद निवडणूक आता चांगलीच रंगात आली आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले काँग्रेसचे उमेदवार छोटू भोयर यांना काँग्रेस बदलणार असल्याच्या चर्चेने वातावरण गरम झालं. त्याच अनुषंगाने काँग्रेसने काल हॉटेल तुली इंटरनॅशनलमध्ये मतदारांची बैठक पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत घेतली. त्यांनी आपल्या मतदारांना मार्गदर्शन सुद्धा केलं. कॅमेऱ्यावर तर सुनील केदार या संबंधाने काही बोलले नाही. मात्र त्यांनी आमचा विजय स्पष्ट असल्याचं संकेत देत काँग्रेसमध्ये कुठलीही गटबाजी नसल्याचं त्यांनी सांगितलं.
100 पेक्षा जास्त मतांनी निवडूण येणार-बावनकुळे
सहलीला गेलेले भाजपचे नगरसेवक नागपुरात परतले. भाजपचे सर्व नगरसेवक पेंच येथील रिसॅार्टमध्ये रवाना
करण्यात आले. उद्या थेट मतदान केंद्रावर येणार भाजपचे नगरसेवक येणार असल्याची माहिती आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी 100 पेक्षा जास्त मतांनी निवडणूक जिंकण्याचा दावा केलाय.