दोन हजारांवर नागरिकांनी स्वगृही जाण्याकरिता मनपाकडे केला अर्ज
कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये राज्यात आणि राज्याबाहेर अडकलेल्या मजूर, विद्यार्थी, पर्यटक आणि अन्य व्यक्तींसाठी केंद्र शासनाने जारी केलेल्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिकेनेही त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला दाद देत नागपुरातून बाहेर जाण्यासाठी सुमारे दोन हजार व्यक्तींनी ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज केले आहेत.
यासाठी नागपूर महानगरपालिकेने https://forms.gle/ra3cySfPtBeVBvzi6 ही लिंक जारी केली आहे. त्या लिंकवर गेल्यानंतर असलेला फॉर्म नागरिकांना भरायचा होता. नागपूर महानगरपालिकेने जाहीर केल्यानंतर शनिवारी (ता. २) दिवसभरात सुमारे एक हजारांवर नागरिकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले.
याव्यतिरिक्त नागपूर महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या बेघर निवाऱ्यातही परराज्यातील अनेक मजूर आहेत. त्यातील ज्या मजुरांना त्यांच्या स्वगृही जायचे असेल त्यांची माहिती देण्याचे निर्देश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी निवारा व्यवस्थापकांना दिले होते. तेथून आणि अन्य ठिकाणाहून ऑफलाईन अर्जाची संख्या ही सुद्धा एक हजारांच्या घरात आहे.
ऑनलाईन अर्ज करणाऱ्यांचा आकडा मिनिटामिनिटाला वाढत असून सायंकाळी ६ वाजतापर्यंत १०५२ व्यक्तींनी अर्ज केले होते. ज्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत, त्यांना नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी संपर्क करून त्यांच्या जाण्यासंदर्भातील व्यवस्थेची माहिती देतील. नागपूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या या सुविधेबद्दल अनेक नागरिकांनी मनपाचे आभार मानत मनपाच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर आभार मानले आहे.
News Credit To:- NMC