क्वारंटाईन सेंटरमध्ये आता 14 दिवसच मुक्काम
नागपूर:- रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ठेवण्यासाठीचा कालावधी कमी झाला असला तरी संशयितांना विलगीकरण केंद्रामध्ये अद्याप 14 दिवस मुक्काम करावा लागणार आहे. सध्या 2500 कोरोना संशयितांना विलगीकरण केंद्रामध्ये ठेवले गेलेले आहे. कोरोना संशयित व्यक्तींच्या विलगीकरण केंद्रावर दोन चाचण्या घेण्यात येतात. पहिली चाचणी निगेटिव आल्यानंतरही दुसरी चाचणी केली जाते. ती सुद्धा निगेटिव आल्यावरच संबंधितास घरी पाठविले जाते. दोन चाचण्या करण्यासाठी आणि अहवाल देण्यासाठी 14 दिवस लागतात. जर चाचणी पॉजिटिव्ह असेल तर ती थेट रुग्णालयात पाठविली जाते. त्यानंतर रुग्णालयातही चाचणी घेतली जाते आणि 10 दिवस ठेवल्यानंतर रुग्णालयातून सोडण्यात येते. आधी 15 दिवस रुग्णालयात ठेवले जायचे.
विलगीकरण केंद्र कुठे?
कोरोना संशयितांना आमदार निवास, वनामती, रवि भवन, लॉ कॉलेज हॉस्टेल, सिम्बायोसिस, पाचपावली, व्हीएनआयटी याखेरीज 3 हॉटेलमध्येही विलग ठेवण्यात आले आहे. उपविभागीय अधिका-यांनुसार, दोन चाचण्या घेतल्या जातात आणि त्यात 14 दिवसांपर्यंत वेळ जातो. मिळालेल्या मार्गदर्शक सूचनांनुसारच काम केले जात आहे. आम्हाला कालावधी कमी असलेल्या नवीन मार्गदर्शक सूचना अद्याप मिळायच्या आहेत.