पावसाचे पाणी घरात…?
नागपुर:- नागपुरात मुसळधार पाऊस आला की नाल्याकाठच्या वस्त्यांमध्ये आणि घरांमध्येही पाणी शिरते. दरवर्षी याबाबत ओरड होते. मनपा प्रशासनाकडे बोट दाखविले जाते. यासंदर्भात अनेक तक्रारीही मनपाला प्राप्त होतात. विषय तसा गंभीरच. परंतु पाऊस संपला की हा विषयही संपतो. पावसाळा आला की पुन्हा हा विषय डोके वर काढतो.
पण यावर्षी या विषयाच्या मुळाशी जाण्याचे मनपा प्रशासनाने ठरविले आणि त्याचा अभ्यास सुरू केला. गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या अभ्यासाअंती या विषयातील अनेक गंभीर बाबी समोर आल्या. हा प्रश्न नैसर्गिक नाही तर मानवनिर्मित असल्याचे अभ्यासाअंती निष्पन्न झाले. शहरातील अनेक गडरलाईनवर नागरिकांनी पक्के बांधकाम करून ठेवले. सुमारे २७५ ठिकाणी गडरलाईनवर घरे बांधणे, अतिक्रमण केल्याचे समोर आले. यामुळे गडरलाईन चोक झाल्यास त्याची दुरुस्ती करता येत नाही. स्वच्छतेत अडथळा निर्माण होतो. चोकेजमुळे घाण पाणी बाहेर येऊन घरात शिरते.
नाल्यांचीही परिस्थिती अशीच आहे. नाल्यांमध्ये काँक्रीटचे स्तंभ उभारणे, स्लॅब टाकणे, त्यावर वऱ्हांडा बांधणे, पक्के बांधकाम करणे, घरे उभारण्यासारखे गंभीर प्रकार आहेत. अनेक ठिकाणी नाल्यामध्येच अतिक्रमण करून नैसर्गिक प्रवाह वळविण्यात आला आहे. नाल्याच्या भिंतीवर बिल्डर्सनी उंच भिंती उभ्या केल्या.
यामुळे बॅक वॉटरमुळे नाल्याचे पाणी बाहेर फेकल्या जाते. परिणामी वस्त्या जलमय होतात. २२७ नाल्यांची संख्या १३० च्या आसपास आल्याची गंभीर बाब यानिमित्ताने उजेडात आली आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर शहरातील नाले गायब होतील आणि पावसाळ्यात सर्वत्र पाणीच दिसेल. ही परिस्थिती टाळायची असेल तर नागरिकांनी स्वत: पुढाकार घेऊन ही अतिक्रमणे काढायला हवी. अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई करण्यास मनपा मागेपुढे पाहणार नाही, हे ही तितकेच खरे!