वीज मीटरचे वाचन सुरू: महावितरण ग्राहकांना आता बिल मिळेल
नागपूर:- कोरोना लॉकडाऊनमुळे महावितरणने मीटरचे वाचन प्रक्रीयाही बंद केलेली होती परंतु आता प्रशासनाच्या परवानगीने कंटेनमेंट क्षेत्र वगळता उर्वरित भागात मीटर रीडिंग सुरू केली जात आहे. तब्बल 23 मार्चनंतर आता मीटर रीडिंगनंतर ग्राहकांना बिल दिले जाईल. दोन ते अडीच महिन्यांसाठीचे एकच बिल असेल. ज्या ग्राहकांनी एप्रिल आणि मे महिन्याचे बिल भरले आहे त्यांची रक्कम समायोजित केली जाईल.
महावितरणच्या प्रवक्त्याने सांगितले की, 1 जूनपासून लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर बिल संकलन केंद्र सुरू करण्याबरोबर मीटर रीडिंगद्वारे बिले वाटण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. अडीच महिन्यांचे बिल एकत्रितपणे पाहून ग्राहकांनी घाबरू नये. लॉकडाऊन दरम्यान सरासरी युनिटचे बिल ग्राहकांना देण्यात आले होते.
ज्या ग्राहकांनी स्वत: वेब पोर्टल व मोबाईल अॅप्सवरून मीटर रीडिंग पाठविले त्यांना त्यानुसार बिल दिले गेले. आता देण्यात येणा-या बिलात ग्राहकांना स्लॅबच्या लाभापासून वंचित ठेवले जाणार नाही. जर 2 महिन्यांत 330 युनिट वापरले गेले तर 330 युनिटचा स्लॅब रेट न आकारता प्रत्येक महिन्यात 165 युनिटचा स्लॅब रेट आकारला जाईल. ज्यांनी सरासरी बिल जमा केले आहे, त्यांच्या बिलातील कायम शुल्क, वीज शुल्क वगळता उर्वरित शुल्क समायोजित केले जातील.