नाग नदी प्रकल्पासंदर्भात ना. नितीन गडकरींशी चर्चा करून निर्णय महापौर संदीप जोशी : प्रकल्पांचा घेतला आढावा
नागपूर:- नाग नदी हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पासंदर्भात येणा-या अडचणी, त्रुट्या दूर करून आवश्यक कार्यवाही संदर्भात त्यांच्याशी संबंधित सर्व अधिका-यांच्या उपस्थितीत बैठक बोलावून त्यानंतरच निर्णय घेण्यात येईल, असे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले.
नागपूर शहरांतर्गत येत असलेल्या नागनदी शुद्धीकरण प्रकल्प व तलावांचे सौंदर्यीकरण, पुनरूज्जीवन या प्रकल्पांची सद्यस्थिती संदर्भात सोमवारी (ता.१) महापौर संदीप जोशी यांनी आढावा घेतला. महापौर कक्षामध्ये झालेल्या बैठकीत उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाने, अधीक्षक अभियंता (सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग) श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता सर्वश्री गिरीश वासनिक, राजेश भूतकर, महादेव मेश्राम आदी उपस्थित होते.
नाग नदी प्रकल्पासाठी ‘जिका’ (जापान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी) अर्थसहाय्य करणार आहे. यासाठी ‘जिका’कडे २५०० कोटींचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानुसार शहरातील नाग नदीच्या उत्तर व मध्य झोनमध्ये ५०० किमी सिवर लाईन बदलण्यात येणार आहे. या प्रकल्पासंदर्भात केंद्रीय नितीन गडकरींनी संकल्पना मांडलेली होती. त्यामुळे त्यांच्याशी या प्रकल्पासंदर्भात सविस्तर चर्चा करूनच निर्णय घेण्यात येईल, असेही महापौर संदीप जोशी म्हणाले.
शहरातील नउ तलावांचे सौंदर्यीकरण व पुनरूज्जीवन करण्याचा प्रस्ताव होता. या नउ तलावांसाठी ७० कोटींची मागणी करण्यात आली होती. मात्र ४० लाख रुपये एवढीच तरतूद आता करण्यात आली आहे. सोनेगाव तलाव सौंदर्यीकरणाच्या प्रकल्पाचा प्रस्ताव देण्यात आला होता मात्र या प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून निधीच आला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय सक्करदरा तलाव प्रकल्पा संदर्भात कार्यादेश होउनही निधी आला नाही. यासंदर्भात संबंधित अधिका-यांनी सविस्तर माहिती ना. नितीन गडकरी यांच्या बैठकीत सादर करावी, असे निर्देशही महापौर संदीप जोशी यांनी दिले.