मेट्रो मार्गिका टप्पा- २ प्रकल्पास सुधारित मान्यता
नागपूर शहरातील मेट्रो रेल टप्पा- २ प्रकल्पास सुधारित मान्यता देण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात (Nagpur Metro Phase-2 Project) आला. याअंतर्गत नागपुरात ४३.८० किमी अंतराची मार्गिका उभारण्यात येईल. या प्रकल्पाकरिता ६ हजार ७०८ कोटी रुपयांचा सुधारित खर्च येईल.
या मध्ये मार्गिका क्रमांक १-ए मिहान ते एमआयडीसी ईएसआर (१८.६५ किमी.). मार्गिका क्रमांक २- ए ऑटोमेटीव्ह चौक ते कन्हान नदी (१३ किमी). मार्गिका क्रमांक ३ए लोकमान्य नगर ते हिंगणा (६.६५किमी). मार्गिका क्रमांक ३-ए – प्रजापती नगर ते ट्रान्सपोर्ट नगर (५.५० किमी) असे मेट्रो मार्ग असतील. जानेवारी २०१४ मध्ये नागपूर मेट्रो रेल्वे टप्पा एक प्रकल्प राबवण्यास सुरवात झाली होती. यामध्ये ४०.०२ किमी लांबीचा मेट्रो मार्ग आणि ३२ स्थानके उभारण्यात आली. या टप्प्याचे लोकार्पण ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले आहे.
नागपूर मेट्रो-2 प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिल्याची माहिती नागपूर मेट्रोने दिली आहे. मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातून शहरातील अनेकांना प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. दुसऱ्या टप्प्यातही अशाप्रकारे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहे. स्टेशनवरील प्रॉपर्टी डेव्हलपमेंटमधून दुकाने लावण्याची संधी आहे.