विमानतळ ते मेट्रोपर्यंत शटल बस सेवा उपलब्ध
नागपूर: मेट्रो प्रकल्पाच्या ऑरेंज आणि एक्वा मार्गावर प्रवासी सेवा दर १५ मिनिटांनी उपलब्ध केली जाते आणि आता विमानतळ मेट्रो स्टेशन ते विमानतळ अशी शटल बसची सुविधा लवकरच महा मेट्रो, नागपूर महानगरपालिका आणि मिहान इंडिया लिमिटेडला जोडली जाईल. विमानतळ मेट्रो स्थानकापासून डॉ बाबासाहेब आंतरराष्ट्रीय विमानतळ व डॉ बाबासाहेब आंतरराष्ट्रीय विमानतळापासून मेट्रो स्टेशनपर्यंत फे-या उपलब्ध आहेत.
शटल सेवा सुविधा इलेक्ट्रिक बसच्या माध्यमातून: यात सामान वाहून नेण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे, जेणेकरुन नागरिक सामानासह विमानतळावर सहज पोहोचू शकतील. सीताबर्डी इंटरचेंज ते विमानतळ मेट्रो स्टेशनपर्यंत मेट्रोचा तिकिट दर ₹10 आहे. तर विमानतळ मेट्रो स्टेशन ते विमानतळ या इलेक्ट्रिक बसची तिकिट ₹10 रुपये राहील. म्हणजे फक्त ₹20 मधे सीताबर्डीहून विमानतळावर पोहोचू शकतो. ही बस सेवा सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत नागरिकांसाठी उपलब्ध असेल. स्वच्छ, सुरक्षित, वातानुकूलित, आरामदायक आणि पर्यावरणास अनुकूल मेट्रो आणि फीडर सेवा निश्चितच प्रदूषण कमी करण्यात मदत करेल.
त्याशिवाय शहरातील इतर परिसरातून आणि मेट्रो स्थानकातून घराकडे जाण्यासाठी महा मेट्रो आणि नागपूर महानगरपालिकेच्या वतीने फीडर बसची खालीलप्रमाणे व्यवस्था केली आहे.
• खापरी मेट्रो स्टेशन ते बुटीबोरी (M.I.D.C.gate)
• खापरी मेट्रो स्टेशन ते एम्स हॉस्पिटल
• लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन ते हिंगणा शासकीय रुग्णालय
• जय प्रकाश नगर मेट्रो स्टेशन ते जयताळा
• जय प्रकाश नगर मेट्रो स्टेशन ते म्हाळगी नगर
• विमानतळ दक्षिण मेट्रो स्टेशन ते बेलतरोडी
• जय प्रकाश नगर मेट्रो स्टेशन ते बेलतरोडी
तसेच शहरातील इतर परिसर सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्थानकापासून फीडर बस सेवेद्वारे जोडण्यात आले आहेत.
मेट्रो नसलेल्या परिसरामध्येही मेट्रो कनेक्टिव्हिटी: नॉन-मेट्रो कॅम्पसमधील मेट्रोची कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी महा मेट्रोने ही पावले उचलली आहेत. अधिकाधिक प्रवाशांना मेट्रोशी जोडणे हे उद्दीष्ट आहे. ज्यामध्ये शहरातील इतर परिसर फीडर सेवेद्वारे मेट्रो स्टेशनला जोडण्यात आले आहेत. आता रूट क्र ४ व ७ सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन ते पिपला फाटा, हुडकेश्वर नाका कॉम्प्लेक्स, राजापेठ, म्हालगी नगर, नवीन सुभेदार नगर, अयोध्या नगर, रघुजी नगर, हनुमान नगर, मेडिकल चौक, बस स्टेशन, कॉटन मार्केट, धरमपेठ, शंकर नगर, रामनगर, रविनगर, डब्ल्यूसीएल कॉलनी, सेमिनरी हिल, हजारी पहाड या सर्व मार्गांवरील प्रवाश्यांसाठी सुविधा उपलब्ध असेल तर रूट क्र. १९ सीताबर्डी मेट्रो स्टेशन ते न्यू नरसाला पर्यंत फिडर सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यात न्यू नरसाळा, भारत माता नगर, महालक्ष्मी नगर, बिडीपेठ, रघुजी नगर बस स्टॉपचा समावेश आहे. उपलब्ध फीडर सेवेच्या मदतीने अधिकाधिक नागरिकांनी मेट्रो आणि फीडर सेवा वापरुन प्रवासाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले गेलेले आहे.