विमान प्रवाशांसाठी राज्य शासनाचे दिशानिर्देश जाहीर
महाराष्ट्र सरकारने सोमवारी (ता.२५) संध्याकाळी राज्यातल्या सर्व विमानतळांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिशानिर्देश जाहीर केले आहेत. या दिशानिर्देशामध्ये विमानतळ प्रशासन आणि प्रवाशांसाठी महत्वाच्या सूचना देण्यात आल्यात आहेत. त्यानुसार राज्यातील विमानतळावर येणा-या सर्व प्रवाशांच्या डाव्या हातावर शिक्का मारण्यात येईल आणि प्रवाशांनी १४ दिवस अनिवार्यपणे गृह विलगीकरणात (होम आयसोलेशनमध्ये) राहणे बंधनकारक आहे.
या कालावधीमध्ये प्रत्येकाला आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. राज्य शासनाच्या या दिशानिर्देशाची नागपुरातही अंमलबजावणी करण्यात येत असून मनपाच्या आरोग्य पथकामार्फत येणा-या व जाणा-या प्रत्येक प्रवाशाची ‘थर्मल स्क्रिनींग केली जात आहे.
राज्य शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक दिशानिर्देशानुसार, विमान प्रवास करणा-या प्रत्येक प्रवाशाला ‘आरोग्य सेतू’ ॲप डाउनलोड करून त्यामध्ये आवश्यक माहिती भरणे आवश्यक आहे. प्रवास सुरु होण्यापूर्वी विमानतळ व्यवस्थापनाद्वारे प्रत्येक प्रवाशाची थर्मल चाचणी केली जात असून कोणतेही लक्षणे न दिसणाऱ्या प्रवाशांनाच फक्त प्रवासासाठी विमानात प्रवेश दिले जाते. सर्व प्रवाशांसह एअरलाईन कर्मचारी, क्रू आदी सर्वांनी मास्कचा वापर करणे तसेच प्रस्थान आणि आगमनानंतरही सर्व ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
आगमनानंतर विमानतळावर वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून सर्व प्रवाशांची थर्मल तपासणी केली जात आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरही येणा-या व जाणा-या सर्व प्रवाशांची थर्मल चाचणी केली जात असून यासाठी मनपाचे आरोग्य पथक तैनात आहे. थर्मल तपासणीमध्ये लक्षणे आढळल्यास संबंधित प्रवाशाला नजिकच्या वैद्यकीय सुविधा केंद्रात नेउन यासंदर्भात केंद्र शासनाद्वारे जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
विमानतळावर येताना किंवा विमानतळावरून निवासस्थानी जाताना प्रवाशांना स्वत:च्या वाहनातून निवासस्थान ते विमानतळ किंवा विमानतळ ते निवासस्थान असा प्रवास करावा लागेल. विशेष म्हणजे, प्रतिबंधित क्षेत्र ते विमानतळ किंवा विमानतळ ते प्रतिबंधित क्षेत्र अशा प्रवासांना परवानगी नाही.
प्रत्येक प्रवाशाने विमानतळावर स्वयं घोषणापत्र (सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म) भरुन घेणे बंधनकारक आहे. स्वयं घोषणापत्रात (सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म) संबंधित प्रवाशी प्रतिबंधित क्षेत्रातील नाही, तो कोणत्याही प्रकारच्या विलगीकरणात नाही, त्याला कोणतिही लक्षणे नाहीत, कोरोनाची चाचणी केली असल्यास त्याचा अहवाल निगेटिव्हच आहे ही सर्व माहिती सादर करणे अनिवार्य आहे.
वरील नियमाचे पालन करणे बंधनकारक राहील. विमानप्रवासांनंतर प्रत्येक प्रवासी हा स्वताचे घरातच १४ दिवसाचे विलगीकराणत राहील. याबाबतीत कुठलीही हयगय संबंधीतां कडून होणार नाही यांची दक्षता संबंधीताने घ्यावयाची आहे. व 14 विलगीकरणाचे अत्यंत काटेकोरपणे व न चुकता पालन करावयाचे आहे.