नागपूर शहराच्या सौंदर्यात भर घालणारे अजनी चौकातील क्लॉक टॉवर पुन्हा एकदा सुरू
नागपूर : अजनी चौकातील मध्यवर्ती कारागृहाकडून प्राप्त जागेवर 2012 या वर्षी मनपाद्वारे क्लॉक टॉवर उभारण्यात आले. यासाठी अंदाजे 40 लक्ष रुपये खर्च करण्यात आले होते. 21 मीटर पॅराबोलिक स्टेनलेस स्टील स्ट्रक्चर वर 2 मीटर उंचीची प्रिझम शेप सॅटेलाईट वॉच लावण्यात आली होती. या घडी व परिसराचे सभोवतालाच्या सौंदर्यीकरणाची देखभाल व दुरूस्तीकरिता दरबार वॉच यांचेद्वारे वार्षिक खर्च 36 लक्ष रुपयांचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्या मोबदल्यात संबंधित कंपनीला मनपा क्षेत्रात पाच गॅन्ट्री उभारून 10 वर्षाकरिता जाहिरात करण्याचे अधिकार देण्याची मागणी होती. तत्कालीन स्थायी समितीद्वारे पाच गॅन्ट्री उभारून तीन वर्षाकरिता जाहिरात करण्याचे अधिकार देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दरवार वॉच कंपनीद्वारे 10 वर्षाकरिता जाहिरात देण्याचीच मागणी करण्यात आली. यावर एप्रिल 2022 मध्ये मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी पुढाकार घेत या घडीसंदर्भात इतर एजन्सी शोधण्याचे निर्देश दिले.
मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे कमी खर्चात आणि कमी वेळेत भारत सरकारच्या अखत्यारितील एचएमटी कंपनीद्वारे ‘क्लॉक टॉवर’ सुरू करण्यात यश आले आहे. याबाबत मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी कमी वेळेत आणि कमीत कमी खर्चात ही घडी सुरू केल्याबद्दल एचएमटी चे अभियंता व्यंकटेश यांचे विशेष अभिनंदन केले. नागपूर शहराची शान वाढविणारे हे ‘क्लॉक टॉवर’ असल्याचे नमूद करीत त्यांनी या परिसराचे सौंदर्यीकरण केले जाणार असल्याचे सांगितले. क्लॉक टॉवरच्या खाली कारंजे लावण्यात येणार असून सभोवताल रेलिंग करण्यात येणार आहे. या भागात नागरिकांना बसण्यासाठीही व्यवस्था केली जाणार आहे.