२८ जूनपासून नागपुरातील सलून उघडणार
राज्य शासनाने दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने मागील तीन महिने बंद असलेले केशकर्तनालय अर्थात सलूनची दुकाने रविवार २८ जून पासून उघडण्यात येतील. परंतु दुकाने उघडल्यावर घालून दिलेल्या नियमांचे पालन करणेही तेवढेच अत्यावशक आहे. यासंदर्भात नागपूर महानगरपालिकेने शनिवारी (ता. २७) एक आदेश जारी करुन ही नियमावलीही नमूद केली आहे.
या आदेशानुसार, सलून आणि ब्युटी पार्लर मर्यादित ग्राहकांना सेवा देण्यासाठी आणि तीसुद्धा पूर्वनिर्धारीत वेळ घेऊन उघडण्याच्या अटीवर परवानगी देण्यात येत आहे. हेअर कट, हेअर डाईंग, वॅक्सीन, थ्रेडिंग हे या दुकानांच्या माध्यमातून करता येईल. त्वचेशी निगडीत कुठलीही सेवा या दुकानातून देता येणार नाही. यासंदर्भात दुकानाच्या दर्शनी भागात ठळकपणे फलक लावणे आवश्यक राहील. सलून, ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी मास्क, ॲप्रॉन, ग्लोव्ज् वापरणे बंधनकारक राहील. ज्या वस्तूंशी ग्राहकांचा संपर्क येईल उदा. खुर्ची, अशा सर्व वस्तू प्रत्येक ग्राहकाला सेवा दिल्यानंतर निर्जंतुक करणे आवश्यक आहे.
इतर सर्व जागा आणि जमिनीचा पृष्ठभाग प्रत्येक दोन तासानंतर निर्जंतुक करावा लागेल. ग्राहकांसाठी डिस्पोजल टॉवेल आणि नॅपकिनचा वापर करावा लागेल. ज्या वस्तू डिस्पोसेबल आहेत त्यांना प्रत्येक ग्राहकांना सेवा दिल्यानंतर त्याचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक राहील. ग्राहकांच्या माहितीसाठी सर्व सलूनमालकांनी दुकानाच्या दर्शनी भागात या सर्व बाबींची माहिती देणारा फलक लावणेही अत्यावश्यक असल्याचे आदेशात म्हटले आहे.
News Credit To NMC