बाजारपेठेत मास्क कारवाई अधिक कडक करा : महापौर दयाशंकर तिवारी
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाद्वारे निर्बंध लावण्यात आलेले आहेत. मात्र शहरातील बाजारपेठांमध्ये अजूनही नागरिक बेजबाबदारपणे वागत असल्याचे दिसून येते. अनेक बाजारपेठांमध्ये नागरिक विना मास्कने वावरताना दिसत आहेत. विना मास्क वावरणा-या नागरिकांमुळे कोरोना संसर्गाचा धोका अधिक आहे. त्यामुळे शहरातील सर्व बाजारपेठांमध्ये मास्क न लावणा-यांविरुद्धची कारवाई अधिक कडक करा, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले. नागपूर शहरात कॉटन मार्केट, बर्डी, गोकूलपेठ, खामला, सक्करदरा, बुधवार बाजार, दहिबाजार पूल बाजार, पारडी, गुलमोहरनगर, सुगतनगर, कमाल टॉकीज, राणीदुर्गावती चौक, जरीपटका आदी ठिकाणी मोठे बाजार भरतात. या बाजारांमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे या सर्व बाजारांच्या वेळेमध्ये संबंधित झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे कारवाई करण्यात यावी. याशिवाय जे दुकानदार मास्क न लावलेले आढळतील, त्यांच्यावरही कठोर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले आहे. मजुरांच्या ठिय्यामध्ये त्यांना मास्क वितरित करण्याचे निर्देशही दिले.
शहरातील कोरोना संसर्गाच्या स्थितीचा महापौर दयाशंकर तिवारी यांनी बुधवारी (ता.२४) आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये आयोजित बैठकीत महापौरांसह उपमहापौर मनीषा धावडे, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, उपनेत्या वर्षा ठाकरे, लक्ष्मीनगर झोन सभापती पल्लवी श्यामकुळे-पन्नासे, धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, हनुमाननगर झोन सभापती कल्पना कुंभलकर, धंतोली झोन सभापती वंदना भगत, नेहरूननगर झोन सभापती स्नेहल बिहारे, लकडगंज झोन सभापती मनीषा अतकरे, आसीनगर झोन सभापती वंदना चांदेकर, मंगळवारी झोन सभापती प्रमिला मथरानी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, सहायक आयुक्त सर्वश्री प्रकाश वराडे, अशोक पाटील, हरीश राउत, गणेश राठोड, सहायक आयुक्त किरण बगडे, सुषमा मांडगे, साधना पाटील, उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे आदी उपस्थित होते.
प्रारंभी महापौरांनी दहाही झोनची रुग्णस्थिती, चाचण्यांची संख्या, मास्कची कारवाई आदीबाबत आढावा घेतला. झोनमधील ज्या भागात सर्वाधिक रुग्णसंख्या आहे, त्या भागाकडे विशेष लक्ष देण्यात यावे. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांची तपासणी व चाचणी करणे, तसेच पॉझिटिव्ह रुग्णांना आवश्यक औषधांचा पुरवठा करण्याबाबत ‘आरआरटी’ला आदेश देण्याचे निर्देश यावेळी महापौरांनी दिले. महापौरांनी कोरोनाची चाचणी प्राथमिक नागरी आरोग्य केन्द्रात २ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे निर्देश दिले. तसेच शांतिनगर आरोग्य केन्द्राचे डॉक्टर विरुध्द कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. आरोग्य सभापती श्री. विरेन्द्र कुकरेजा, वरिष्ठ नगरसेवक श्री. सुनील अग्रवाल यांनी बैठकीत योग्य सूचना केल्या.
नगरसेवकांच्या समन्वयाने जनजागृती करा
कोरोना संसर्गाच्या संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती होणे अत्यावश्यक आहे. ज्या भागामध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळतो त्या भागातील नगरसेवकाला त्याची माहिती देण्यात यावी. नगरसेवकांच्या सहकार्याने त्या रुग्णाचे ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’करण्यात यावी. याशिवाय जनजागृतीसाठीही नगरसेवकांचे सहकार्य घेण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.
कोरोना संदर्भात जनजागृतीसाठी संबंधित झोन सभापतींनी त्यांच्या झोनमधील मोठ्या बाजारांमध्ये सर्व संबंधित नगरसेवक आणि सहायक आयुक्तांच्या सोबतीने ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना सूचित करावे. याशिवाय रहिवाशी भागांमध्येही जनजागृती करण्यात यावी, असे आवाहन यावेळी महापौरांनी सर्व झोन सभापतींना केले.