बापरे! 44.6 तापमानात वृक्ष लागवड; नागपूर महापालिका करणार 2 कोटींचा
नागपूर (Nagpur) : महापालिकेला प्रामाणिकपणे वृक्ष लावायचे आणि जगवायचे आहेत की फक्त दिखावा करायचा आहे, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. वृक्ष केव्हा लावावे याचे काही नैसर्गिक नियम आहेत. मात्र, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी चक्क ४४.६ डिग्री तापामानात वृक्ष लागवड मोहीम सुरू केली आहे. यावर तब्बर सव्वा दोन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. भर उन्हाळ्यातील लागवडीने वृक्ष जगण्याची सुतराम शक्यता नसल्याने सव्वा दोन कोटी रुपयांचा पालापाचोळा होणार आहे.
महापालिकेतर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत परिसरातील जागेमध्ये आठ हजार रोपांची लागवड करून येथे वन आच्छादन करण्यात येणार आहे. या वृक्ष लागवडीला महापालिका आणि विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थित थाटात सुरुवात करण्यात आला. सध्या नागपूरचा पारा ४४ डिग्रीच्यावर गेला आहे. या तापमानात वृक्ष लागवडीसाठी शहरातील भौगोलिक स्थिती अनुकूल नाही, ही बाब शहरातील कुणीही सांगू शकेल. परंतु उच्चविद्याभूषित अधिकारीच यापासून अनभिज्ञ दिसून येत आहे. यावेळी आयुक्तांनी वृक्षलागवड व झाडांना पाणीपुरवठ्यासाठी यंत्रणा उभारण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
पाच वर्षांपूर्वी अनिल सोले महापौर असताना महापालिकेने एका दिवशी एक लाख वृक्ष लागवड करण्याचा विक्रम नोंदवला होता. त्यानंतर ती झाडे कुठे गेली याचा कोणालाच थांगपत्ता लागला नाही. महापालिकेच्या उद्यान विभागालाही ही झाडे सापडली नाहीत. पावसाळा सुरू झाल्यावर वृक्ष लागवड केली जाते. त्यामुळे झाडे जगतात. मात्र महापालिका हा नैसर्गिक नियमच मानायला तयार नाही. केंद्र सरकारने पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत मनपाला २ कोटी १४ लक्ष रुपये दिले आहेत. यातून विद्यापीठाच्या १५ एकर जागेमध्ये वृक्ष लागवड करण्यात येणार असून आज ४४.६ अंश सेल्सिअस तापमानात या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे या तापमानात लावलेली झाडे जगणार कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.