नगरपालिकेच्या दोन शाळा होतील डिजिटलाईज
वणी: नगरपरिषद शाळा क्रमांक एक आणि सात या आठवड्यात डिजिटलाईज होणार आहे. मंगलसुधा फाउंडेशनचे अध्यक्ष मनीष बुरडकर यांनी त्यांच्या विवाहानिमित्त हा संकल्प केला आहे. ते या दोन शाळांना 40 इंची अँड्रॉइड टीव्ही भेट देणार आहेत. जे थेट इंटरनेटची कनेक्ट होऊ शकतील. मनीष हे मूळचे वणीतील सुतारपूर येथील. ते सध्या पुण्यात कार्यरत आहेत. शाळा क्रमांक एकचे मुख्याध्यापक वसंता आडे आणि शाळा क्रमांक सातचे मुख्याध्यापक गजानन कासावार हे स्मार्ट टीव्ही स्वीकारतील.
मनीष देशाच्या डिजिटलायझेशनकडे लक्ष वेधू इच्छितात. ते म्हणतात की, खाजगी शाळांमध्ये पुरेसं डिजिटलायझेशन झालं आहे. मात्र तालुकास्तरावरील आणि ग्रामीण भागातील अनेक शाळांपर्यंत संगणक पोहोचले नाहीत. त्यामुळे हे विद्यार्थी आधुनिक तंत्रज्ञानापासून वंचित आहेत. त्यांचे वडील सुधाकरराव हे प्रसिद्ध मूर्तिकार आणि म्युरल आर्टिस्ट आहेत आई मंगला या गृहिणी आहेत. त्यांच्याच प्रेरणेतून मनीष यांनी मंगलसुधा फाउंडेशन ही सामाजिक संस्था सुरू केली. या संस्थेच्या माध्यमातून चित्रकला स्पर्धा, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, बेटी बचाव आंदोलन असे उपक्रम ते राबवीत असतात. इतर संस्थांच्या सामाजिक उपक्रमांमध्ये देखील ते हिरीरीने सहभागी होतात. त्यांच्या उपक्रमात आई-वडिलांसह भाऊ सुयोग, पंकज, पराग आणि मित्रपरिवार साथ देत आहेत. भविष्यातही कला आणि सामाजिक क्षेत्रात भरपूर कार्य करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांना संगणक द्यावेत अशी विनंती त्यांनी यावेळी केली आहे.