माझी हालचाल बंद होती तेव्हा तुमची हालचाल चालू झाली – उध्दव ठाकरे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मौन बाळगलं होतं पण अखेरीस त्यांनी मुखपत्र असलेल्या सामनाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ते सोडलं. बंडाची बातमी केव्हा समजली या राऊत यांच्या प्रश्नाला उत्तर देताना उध्दव ठाकरेंनी माझी हालचाल बंद होती आणि तुमची हालचाल सुरू होती असा वाक्यप्रयोग बंडखोर आमदारांबाबत केला. “आम्ही पक्ष ‘प्रोफेशनली’ चालवत नाही. आपण पक्षाकडे एक परिवार म्हणून बघत आलोय. बाळासाहेबांनी आपल्याला तेच शिकवलंय. आपलं म्हटल्यावर आपलं असं माँ नीदेखील शिकवलं आहे. कदाचित राजकारणामधला गुन्हा किंवा चूक असेल ती आमच्याकडून वारंवार होते. एखाद्यावर विश्वास टाकला की आम्ही त्याच्यावर अंधविश्वास टाकतो. पूर्ण जबाबदारीने त्याला ताकद देणं असेल, शक्ती देणं असेल आम्ही ते करतो. पण आता ज्यांच्यावर आम्ही विश्वास टाकला त्यांनीच विश्वासघात केलाय,” असे उद्धव ठाकरे म्हणाले .
‘‘सरकार गेले, मुख्यमंत्रीपद गेले याची खंत नाही; पण माझीच माणसे दगाबाज निघाली. मी रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर गुंगीत असताना सरकार पाडण्याचे प्रयत्न झाले,” असे भावनिक उद्गार माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले. दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या बाबतीत विश्वासघाताचं राजकारण वारंवार का होतं असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना आम्ही पक्ष प्रोफेशनली चालवत नसल्याचे ते म्हणाले. काही दिवसांपूर्वीच राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आणि शिवसेनेच्या काही आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमत्रिपदाची शपथ घेतली.