कधी होणार पारडी उड्डाणपूल तयार, कासव गतीचे सुरू आहेलकाम
नागपूर:- निष्काळजीपणाच्या सर्व मर्यादा जणू ओलांडल्या आहेत अशा धिम्या गतीने पारडी नाका ते एचबी टाऊन चौक या उड्डाणपुलाचे मंद कामांमुळे स्थानिक नागरिक व रहिवासी व्यापा-यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 4 वर्षे पूर्ण झालीत तरी पारडी उड्डाणपूल पुर्णत्वास येण्याचे नाव काही घेत नाहीय.
ठरलेल्या मुदतीस एक वर्षाहून अधिक कालावधी उलटूनही उड्डाणपुलांचे 60 टक्के काम अद्याप बाकीच आहे. बांधकाम मंद गतीने सुरू असल्याने स्थानिक नागरिक ब-याच अडचणींतून जात आहेत. त्याचबरोबर मंद गती आणि सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आतापर्यंत या मार्गावर अनेक जीवघेणे अपघात झाले आहेत. असे असूनही पारडी उड्डाणपुलाच्या या मंद कामाकडे कोणी अधिकारी किंवा कोणते नेते लक्ष देत नाहीत.
रस्ते बनले धोकादायी: पंतप्रधानांच्या हस्ते पारडी उड्डाणपूलाचे भुमि पुजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे उपस्थितीत पार पडले. उड्डाणपूल पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला 3 वर्षांचा कालावधी देण्यात आला, परंतु पुलाचे केवळ 40 टक्के काम पूर्ण झाले. उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. त्याचबरोबर, अवजड वाहने सोडल्यामुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे, पावसात तर विचारता सोय नाही अशी दशा आहे.
चौकात बॅरिकेड बसविण्यात आल्याने वाहनचालकांना अन्य मार्गावरून वाहने येताना दिसत नाहीत. यामुळे बहुतेक अपघात होतात. या व्यतिरिक्त पारडी चौक ते एचबी टाऊन या एकाच लेनचे सिमेंटकरण काम पूर्ण झाले आहे. सकाळीच फुटपाथवर बाजार सुरू होतात. एकच वाहन जाण्याच्या जागेमुळे इतर दुचाकी वाहने पर्यायी रस्त्यावर मार्ग चाचपडतात.
डिसेंबर २०२० मुदतवाढ: पारडी नाका ते इतवारी, इनर रिंगरोड मानेवाडा ते कळमना व राणी प्रजापती चौक ते वैष्णोदेवी चौक चौपदरी उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. 31 मार्च 2016 रोजी गॅनॉन डंकर्ले अँड कं आणि एसएमएस इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी. ला उड्डाणपुलाच्या बांधकामाचे कंत्राट मिळालेय या मार्गावर 448..32 कोटी रुपये खर्चून सुमारे 6.94 किमी लांबीचे फोर लेन ओव्हरब्रिज तयार करण्यात येणार आहे.
हा ओव्हरब्रिज 30 मार्च 2019 पर्यंत पूर्ण होणार होता. परंतु अद्याप फक्त 19.18 टक्केच उड्डाणपुल बांधकाम होऊ शकले. उड्डाणपुलाची अंतिम मुदत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढविली आहे. या मार्गावरील नागरिकांना दीड वर्ष रहदारी व इतर समस्यांना आणखी सामोरे जावे लागेल.
ड्रेनेजचे काम अपूर्ण: अवजड वाहनांसाठी व कलमना ते पारडी चौक जोडणा-या वर्धमान नगर रेल्वे क्रॉसिंग पर्यंत रस्त्यांवर ड्रेनेज चे काम सुरू आहे. वास्तविक परिस्थिती पाहिल्यास कळमना चौक जवळ उड्डाणपुलाच्या लँडिंगजवळील रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. काम अर्धवट स्थितीत आहे.
अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यावर खोल खड्डे पडले असून पावसाचे पाणी त्यात साचत आहे, त्यामुळे रस्त्यावर जीवघेणे अपघात होत आहेत. असे असूनही कंत्राटदार ना ते खड्डे बुजवत आहेत ना उड्डाणपुलांच्या निर्मितीला गती देत आहेत.