FestivalNagpur LocalNMC

यंदाचा गणेशोत्सव “आरोग्योत्सव” म्हणून साजरा करू

सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. नागपुरात रुग्णसंख्या दोन हजारापर्यंत पोहोचली आहे. अशात आपल्याला अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. पुढील महिन्यात २२ ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होणार आहे. मात्र कोरोनाच्या या संकटात दरवर्षीप्रमाणे आपल्याला हा उत्सव साजरा करायचा नाही आहे. गणेशोत्सवासंबंधी लवकरच राज्य शासनाचे दिशानिर्देश जारी होतील. मात्र आपण सर्वांनी दक्षता घेउन यंदाचा गणेशोत्सव हा आरोग्योत्सव म्हणून करूया, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

नागपूर महानगरपालिकेतर्फे गणेशोत्सवाच्या पूर्वतयारी निमित्त करण्यात येणा-या उपाययोजना संदर्भात मंगळवारी (ता.७) महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेत मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीतून त्यांनी नागपूरकरांना आवाहन केले. याप्रसंगी उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, प्रतोद दिव्या धुरडे, लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, धरमपेठ झोन सभापती अमर बागडे, धंतोली झोन सभापती लता काडगाये, नेहरूनगर झोन सभापती समिता चकोले, गांधीबाग झोन सभापती वंदना येंगटवार, सतरंजीपूरा झोन सभापती अभिरूची राजगिरे, मंगळवारी झोन सभापती गार्गी चोपरा, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाने, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन डॉ. प्रदीप दासरवार यांच्यासह सर्व झोनचे सहायक आयुक्त उपस्थित होते.
यावेळी बोलताना महापौर संदीप जोशी म्हणाले, २२ ऑगस्टपासून सुरू होणा-या गणेशोत्सवासंबंधी येत्या २० जुलैपर्यंत महाराष्ट्र शासनाचे दिशानिर्देश जारी होतील. मात्र कोव्‍हिडची सद्याची स्थिती पाहता शहरवासीयांनी काळजी घेणे गरजेचे आहे. शक्यतो सार्वजनिक गणेशोत्सव टाळावे. या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी आरोग्योत्सव साजरा करण्यात यावे. आजच्या परिस्थितीशी निगडीत समाजात जनजागृती करणारे आरोग्याबाबत दक्ष करणारे कार्यक्रम घेण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाप्रमाणेच शहरातही कोणत्याही गणेशमूर्ती चार फूट पेक्षा जास्त उंचीच्या नसाव्यात. उत्सव साजरा करताना ५० लोकांपेक्षा जास्त जणांची उपस्थिती नसावी. सर्व ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे पालन व्हावे, सर्वांनी मास्क लावावे, हँड सॅनिटायजरचा वापर करावा. विशेष म्हणजे, श्री गणेशाची स्थापना करताना किंवा विसर्जन करतानाच्या मिरवणूका टाळावे, असेही आवाहन महापौरांनी केले आहे.
विघ्नहर्त्या श्रीगणेशाचा यंदाचा उत्सव आपल्याला कोरोनाच्या संकटाचा सामना करताना विशेष काळजी घेउनच साजरा करायचा आहे. कुठेही नागरिकांची गर्दी होणार नाही याचीही विशेष दक्षता घ्यायची आहे. गणेश मूर्तींचे विसर्जनही कृत्रिम तलावातच करायचे आहे, असेही आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

Nagpur Updates

Nagpurupdates is your local/Digital news, entertainment, Events, foodies & tech website. We provide you with the happening news, Page3 Contain and all about Nagpur Foodies & Infrastructure from the Nagpur and world.

Related Articles

Back to top button

Adblock Detected

Disable Your Add Block To View Page.