नागपुरात युवतींना तलवार व त्रिशूळ वाटप
सातत्याने घडत असलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांविरुद्ध आता महिलांनीच आवाज उठविण्याची गरज निर्माण झाली आहे. स्वसंरक्षणार्थ लढण्यासाठी समाजातील प्रत्येक स्त्री कटिबद्ध व्हावी या उद्देषाने डॉ. प्रवीण तोगडिया यांच्या आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेतर्फे (आयएचपी) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त युवतींना त्रिशूळ आणि तलवारचे वाटप महालातील छत्रपत्री शिवाजी महाराज चौकात बुधवारी करण्यात आले.
हिंगणघाट येथील पेट्रोल हल्ल्याचे प्रकरण अगदीच ताजे आहे. प्रकरणातील महिला प्राध्यापक सात दिवसांच्या संघर्षानंतर मृत पावली. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा महिलांची सुरक्षा, त्यांच्यावर होणारे अत्याचार, अशा प्रकारच्या वाढलेल्या घटना आणि मनुष्यातील या पाशवी वृत्तीला-मानसिकतेला बदलविण्याची गरज आदी मुद्दे पुढे आले आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. घटनेनंतर काही दिवस हळहळ व्यक्त होते. कँडल मार्च निघतात. मोर्चे, आंदोलन, धरणे होऊन सात दिवसांत शांतता पसरते.
पुन्हा नव्याने अशीच एखादी घटना घडते आणि पुढील चक्र फिरू लागते. या प्रकारच्या घटनांमध्ये आरोपीला होणाऱ्या शिक्षांची संख्या काही वर्षांमध्ये वाढली आहे. न्यायपालिकादेखील अशा प्रकरणांमध्ये तत्परता दाखवित आहे. परंतु, या घटनांना आळा घालण्यासाठी मानसिकता बदलविण्याची आणि घटना घडण्याची शक्यता असल्यास जागच्या जागी लागलीच थांबविण्याची गरज आहे. यासाठी महिलांनी सक्षम व्हायला आहे.
महिला सशक्त झाल्या. त्यांनी लगेच घनास्थळी संबंधित विकृतीला चोप दिल्यास अशा घटनांवर नियंत्रण येऊ शकणार आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेतर्फे शिवजयंतीला त्रिशूळ आणि तलवार वाटप करण्यात आले, अशी माहिती प्रांतमंत्री किशोर दिकोंडवार यांनी दिली.
त्रिशूळ आणि तलवार वाटप उपक्रमासाठी आयएचपीतर्फे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत सुमारे तीस युवतींनी उपस्थिती दर्शविली. त्यांना स्वसंरक्षणासाठी त्रिशूळ आणि तलवार देण्यात आली. या शस्त्राचा गैरवापर न करता केवळ स्वत:च्या संरक्षणार्थ शस्त्र वापरणार असल्याची शपथ देण्यात आली. तसेच या प्रकारच्या घटना कुठे घडत असल्याचे आढळताच त्याचा बिमोड करण्याचा संकल्प करण्यात आला.