फडणवीस सरकारने विदर्भाला दिलेले ४ हजार कोटी परत का गेले ?
माजी मंत्री बावनकुळे यांचा महाविकास आघाडी सरकारला सवाल – श्रेय घेण्याच्या चढाओढीत जनतेचे नुकसान
नागपूर : राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने विदर्भाचा विकासासाठी दिलेला ४ हजार कोटी रुपयांचा निधी विद्यमान महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे परत गेला असा आरोप माजी ऊर्जा मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती हा विदर्भातील जनतेसाठी काळा दिवस असून मागील एक वर्षात विदर्भाच्या विकासासाठी या सरकारने कुठलाही निर्णय घेतला नाही अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे.
बावनकुळे यांनी म्हटले आहे की, महाराष्टातील कुठल्याही जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीला निधी मिळालेला नाही. मुख्यमंत्री मुंबईचे, उपमुख्यमंत्री पुण्याचे आणि मंत्री आपापल्या मतदार संघाचे असा कारभार सध्याच्या सरकारचा सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षाच्या सरकारमध्ये श्रेय घेण्याचा चढाओढीत विदर्भातील सर्व योजना ठप्प पडलेल्या आहेत. विदर्भ वैधानिक विकास मंडळ बंद करून या सरकारने विदर्भावर फार मोठा अन्याय केला आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्यात होणारे विधिमंडळाचे अधिवेशन या सरकारने मुंबईला पळविले. यंदा पावसामुळे सोयाबीन, तुर, कापूस, धान आणि फळ- भाज्यांचे दहा हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. पण सरकारने फक्त शंभर कोटी रुपयांची मदत जाहीर केली. पाच कोटी ग्राहकांच्या वीज बिलाचा प्रश्न या सरकारला सोडविता आलेला नाही. ऊर्जा मंत्र्यांनी दिलेले आश्वासन त्यांच्याच पक्षाचे मंत्री खोडून काढीत आहेत. संजय गांधी निराधार योजना समित्यांचे अजूनही गठण झालेले नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना अनुदान मिळालेले नाही. लोकांचे रेशन कार्ड काढले परंतु आरसीआयडी नंबर मिळत नाही. रस्ते, वीज, पाणी यांचा बॅकलॉग वाढत आहे. जलसंधारणाचे कामे बंद पडली आहेत. हे सरकार विदर्भाला सापत्न वागणूक देत असून मागील एक वर्षात विदर्भाच्या वाट्याला काहीही आले नाही मग हे सरकार वर्षपूर्तीचा आनंद साजरा करून विदर्भातील जनतेच्या दुःखावर मीठ चोळत आहे, असा आरोप देखील बावनकुळे यांनी केला आहे.