महाराष्ट्रात 14 एप्रिलनंतर देखील लॉकडाउन वाढणार आहे. किमान 30 एप्रिलपर्यंत राहणार
या वाढलेल्या कालावधीचे स्वरूप कसे असेल, मजूर व कामगारांचे काय तसेच उद्योगांसाठी काय करायचे या बाबी 14 एप्रिलपर्यंत आम्ही स्पष्ट करीत आहोत
आज पंतप्रधानांची राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्स झाली. वर्षा निवासस्थानाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहभागी होऊन संवाद साधला. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता उपास्थित होते
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रथम पंतप्रधानांना राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत अवगत केले. ते म्हणाले की राज्यातील चाचणी गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सुमारे 33 हजार चाचण्या घेण्यात आल्या असून 1574 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आहेत तर 30 हजार 477 जणांचे निगेटिव्ह आहेत. 188 रुग्ण बरे करून घरी पाठवले आहेत.
बाधित क्षेत्रांसाठी आम्ही तत्काळ तपासणी, अलगीकरण, विलगीकरण धोरण याची परिणामकारक अंमलबजावणी करीत असल्याने संख्या वाढत असली तरी फैलाव रोखण्याचा आम्ही चांगला प्रयत्न करीत आहोत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की मृत्यू दर इतर राज्यांच्या तुलनेत जास्त असला तरी जास्तीतजास्त मृत्यू अति धोका गटातील ज्येष्ठ आणि ज्यांना इतरही काही आजार आहेत यांचे झाले आहेत.
राज्यातील तपासणीसाठी आलेल्या 70 टक्के लोकांत लक्षणे दिसत नाहीत. यातील रोज 150 लोकांना आम्ही प्राथमिक उपचार करून बरे करून पाठवत आहोत. राज्यात कोविड उपचारांसाठी तीन स्तरावर व्यवस्था केली असून अगदी सर्दी, ताप, न्यूमोनिया लक्षणांसाठी कोविड केअर सेंटर, मध्यम स्वरूपाच्या लक्षणांसाठी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि गंभीर रुग्णांसाठी डेडिकेटेड कोविड रुग्णालयातून उपचार करीत नाहीत अशी माहितीही त्यांनी दिली
राज्यात मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी संख्या वाढत असली तरी इतरत्र परिस्थिती नियंत्रणात हे सांगताना मुख्यमंत्र्यांनी सांगली जिल्ह्याचे उदाहरण दिले.
परराज्यातील सुमारे 6 लाख श्रमिक, कामगार, स्थलांतरित यांना निवारा केंद्रातून दोन वेळेसचे जेवण, नाश्ता देण्यात येत आहे पुल टेस्टिंग किंवा ग्रुप टेस्टिंग बाबत केंद्राने विचार करावा त्याचप्रमाणे सारी रोगाच्या प्रादुर्भावकडेही आमचे लक्ष आहे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी पीपीई किट, एन 95 मास्क, इतर वैद्यकीय उपकरणे लवकरात लवकर मिळावेत अशी मागणी केली बहुतेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉक डाऊन वाढविण्याबाबत मत व्यक्त केले.