वय? १६ वर्षे. कर्तृत्व? एका रोबोटिक्स कंपनीचा CEO. पुढचा प्लॅन? भारतीय सैन्यासाठी ड्रोन तयार करणे!
भारतीयांनी आतापर्यंत प्रत्येक क्षेत्रात आपली बुध्दीमत्ता सिध्द केली आहे. त्यामुळे भारतीयांना जगभरातील विविध देशांमध्ये नेहमीच मानाचे स्थान मिळत असते. परिणामी, देशाची गौरवशाली वाटचाल दिमाखात सुरू आहे.याच वाटचालीचा दाखला देणारे एक संशोधन एका १६ वर्षीय भारतीय मुलाने केले असून केवळ देशच नव्हे तर जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे राहणाऱ्या हर्षवर्धन झाला असे या अल्पवयीन मुलाचे नाव असून त्याने भूसुरूंगाचा शोध घेऊन ते नष्ट करणारे ड्रोन विकसित केले आहे.कसे आहे नेमके हे ड्रोन ते या लेखातून जाणून घेऊया.
भारतात ड्रोनचा वापर होणे ही आता तशी विशेष बाब राहिलेली नाही. त्यामुळे सीमा सुरक्षेपासून अगदी लग्नांमध्ये फोटोग्राफी, व्हिडीओग्राफीपर्यंत ड्रोनचा वापर होतांना दिसतो.परिणामी, केंद्र सरकार ड्रोनच्या वापरासंदर्भात लवकरच काटेकोर नियमावली अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्नशिल आहे.पण गुजरातमधल्या हर्षवर्धन सिन्हा या १६ वर्षाच्या मुलाने स्वतःच्या कंपनीतच हे ड्रोन विकसित केले आहे जे सीमेवर हौतात्म्य पत्करणाऱ्या सैनिकांचा जीव वाचविण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. ही अनोखी व महत्त्वपूर्ण उपयोगिता असल्यामुळेच या ड्रोनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
हर्षवर्धनसिन्हाने तयार केलेल्या या ड्रोनला “इगल ए सेव्हन” असे नाव दिले आहे.
या ड्रोनच्या तंत्रज्ञानाबदृल बोलतांना तो म्हणाला की, या ड्रोनमध्ये वापरण्यात आलेले तंत्रज्ञान आतापर्यंत कुठेही उपलब्ध नसून ते वापरात आलेले नाही.रिमोटच्या सहाय्याने वापरल्या जाणाऱ्या या ड्रोनमुळे भूसुरूंग शोधून काढून ते निकामी करणे शक्य होणार आहे.भारतीय लष्कर आपल्या छावणीतून या ड्रोनचा वापर करू शकणार असून ड्रोनला भूसुरूंग सापडला की तो छावणीतील अधिकाऱ्याना माहिती पाठवेल. शिवाय ड्रोनवर असलेल्या कॅमेऱ्यामुळे अधिकाऱ्यांना तो भूसुरूंग पाहता येईल व ड्रोनच्याच सहाय्याने तो लागलीच निकामी देखील करता येईल.हे ड्रोन कुठल्याही प्रकारच्या जमिनीखालील सुरूंग शोधून काढू शकते. त्यामुळे भूसुरूंगांचे स्फोट घडवून आणल्यामुळे होणारी सैन्याची जिवीनहानी रोखणे शक्य होईल.विशेष म्हणजे हर्षवर्धन सिन्हाने केलेल्या या संशोधनाला दक्षिण कोरिया, अमेरिका, फ्रान्स, दुबई व थायलंड या देशांकडून देखील मागणी असून या देशांमधील कंपन्यांनी त्याला भागिदारी करण्याची आॅफर दिल्याचेही तो म्हणाला.
एवढेच नव्हे तर आमच्या देशात येऊन कंपनी सुरू करा, आम्ही आर्थिक पाठबळ देऊ असेही काही परदेशी कंपन्यांनी सांगितल्याचे त्याने स्पष्ट केले.
पण आपल्या देशात भूसुरूंगाचा स्फोट झाल्याने अनेक जवान शहीद होतात. त्यामुळे मला भारतीय लष्कर आणि सीआरपीएफसारख्या सुरक्षा दलांसाठी ते तंत्रज्ञान आणखी विकसित करायचे आहे. म्हणून परदेशी कंपन्यांच्या सर्व आॅफर्स नाकारल्याचे हर्षवर्धन म्हणाला.हर्षवर्धनसिन्हा हा वयाच्या दहाव्या वर्षापासूनच अशा नवनवीन तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी प्रयत्नशिल असतो. त्याला रोबोटिक्सची देखील आवड असल्याने त्याने “अॅरोबाॅटिक्स सेव्हन” या कंपनीची स्थापना केली आहे.या कंपनीच्या माध्यमातून सर्वांचे जीवन सोपे करण्यासाठी आवश्यक त्या तंत्रज्ञानाचा शोध घेतला जाईल, असे तो म्हणतो.
भूसुरूंगाचा धोका
देशाच्या शत्रू राष्ट्रांकडून सैनिकांवर हल्ले होण्याच्या घटना तशा नवीन नाही. पण अनेकदा अशा घटनांमध्ये भूसुरूंगांचा वापर केला जातो. त्यामुळे कुठलीही पूर्वकल्पना येण्यापूर्वीच स्फोट घडवून आणत मोठी जिवीतहानी करणे शक्य होते.
भूसुरूंगाचा वापर नक्षलवादी देखील करू लागल्याचे गेल्या काही वर्षात घडलेल्या घटनांमध्ये दिसून आले आहे.
नक्षलवाद्यांनी झारखंड, छत्तीसगढ, ओरिसा, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र या राज्यांमध्ये असलेल्या वनक्षेत्रात ठिकठिकाणी भूसुरूंग व आयईडी पेरून सुरक्षा यंत्रणांची वाहने स्फोटांमध्ये उडवून देत मोठया प्रमाणात जिवीतहानी घडवून आणली आहे.निमलष्करी दले व स्थानिक पोलीसांना पेरलेले भूसुरूंग शोधून ते निकामी करण्याचा अनुभव नसल्याने हा धोका अधिकच वाढत चालला होता.परिणामी, केंद्र सरकारने नक्षलवादी प्रभावित क्षेत्रात सुरक्षा दलांसाठी घातक ठरणारे भूसुरूंग शोधून ते निकामी करण्यासाठी लष्करी तज्ज्ञांची मदत घेण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. यावरून भूसुरूंगांचा धोका अधोरेखित होतो.
भूसुरूंग हे केवळ सुरक्षा यंत्रणांसाठीच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर देखील बेतले आहेत.
नक्षलवाद्यांनी २०१० मध्ये भूसुरूंग पेरून रेल्वेरूळ उडवून दिल्याने हावडा-मुंबई या एक्सप्रेसला भीषण अपघात झाला होता. या अपघातात सुमारे १५० नागरिकांनी प्राण गमावले होते.त्यानंतरही भूसुरूंगांचा वापर करून जिवीतहानीच्या अनेक घटना घडल्या आहेत. एका अहवालानुसार जगातील ७८ देशांमध्ये भूसुरूंग स्फोटांचा धोका सर्वाधिक असून या देशांमध्ये वर्षाला १५ ते २० हजार लोक मरण पावत असून त्यात ८० टक्के सर्वसामान्य जनता असते.त्यामुळे ड्रोनच्या माध्यमातून भूसुरूंग शोधून ते नष्ट करण्याचे तंत्रज्ञान निश्चितपणे देशाच्या सुरक्षेत महत्त्वपूर्ण योगदान देणारे ठरू शकते.
गेल्या चार वर्षात सरकारकडून सुरक्षा यंत्रणांची ताकद वाढविण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत. शिवाय अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर देखील भर दिला गेला आहे.
त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरात योगदान देण्याची प्रेरणा तरूणाईला मिळत असून पर्यायाने संशोधनालाही प्रोत्साहन मिळत आहे व त्यातून हर्शवर्धनसारखी मुले तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रयत्नशिल आहेत.तंत्रज्ञानाचे संशोधन काही दिवसांपूर्वी नाशिक येथील एका १९ वर्षीय युवक अजिंक्य जाधव याने सियाचिनसारख्या जगातील सर्वात उंचीवरील आणि सर्वाधिक गारठा असलेल्या युध्दभूमीवर तैनात राहणाऱ्या भारतीय जवानांसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या मार्गदर्शनात खास पोशाख तयार केल्याचे समोर आले होते.हा पोशाख जवानांना थंडीसह शत्रूपासूनही संरक्षित करणारा असून त्याला संरक्षण मंत्रालयाने देखील अनुकूलता दर्शविली.
तर पुण्यातील हाकिझ काझी या १२ वर्शीय मुलाने “ईआरव्हीआयएस” हे अनोखे जहाज तयार केले असून ते समुद्रातील प्रदूषण कमी करण्याबरोबरच समुद्री जीवांचा बचाव करणार आहे.
समुद्रातील जीव प्लास्टिक कचरा खात असून त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे एकाचवेळी समुद्री जीव, पाणी व कचरा वेगळा करणारे हे जहाज या मुलाने तयार केले आहे.एकूणच हर्षवर्धन झाला, अजिंक्य जाधव व हाकिझ काझी या तिन्ही लहान मुलांनी गेल्या काही दिवसांत केलेली संशोधने ही भारतीय बुध्दीमत्तेची उदाहरणे जगासमोर मांडणारी आहेत.अशाप्रकारच्या तंत्रज्ञानांच्या शोधाचा फायदा भविष्यात केवळ भारतालाच नव्हे तर जगभरातील विविध देशांना होणार आहे.