“स्वच्छ भारत” अभियानात दुर्लक्षित राहिलेला स्वच्छता कामगार…
मॅन्युअल स्कॅवेन्जर्स म्हणजे हाताने काम करणारे स्वच्छता कामगार. ह्यांच्या कामाचे स्वरूप बघितलं तर आपल्या अंगावर काटा येतो.वाईट वास लांबून जरी आला तरी घरात आपण उदबत्त्या लावतो, रूम फ्रेशनर मारतो, रस्त्यावरून जाताना नाला किंवा उघडे गटार दिसले तर लगेच नाकावर रुमाल लावतो, पण आपल्या स्वच्छता कामगार भावांना मात्र ह्याच घाणीत उतरून चक्क हाताने काम करावे लागते.त्यांच्या कामाविषयी नुसते ऐकले तरी सर्वसामान्य माणसाच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत. कुठलेही गटार तुंबले किंवा नाला तुंबला तर सर्वसामान्य माणूस काय करतो? तक्रार करतो आणि तिथे त्याचे काम संपते.मात्र ते तुंबलेले गटार किंवा नाला किंवा ड्रेनेज, सीवेजची पाईपलाईन परत दुरुस्त करून सुरु करणे हे ह्या स्वच्छताकामगारांना करावे लागते. तेही ऑटोमॅटिक मशिनरी वापरून नव्हे तर मॅन्युअली म्हणजेच हाताने.प्रसंगी त्यांना त्या घाणीत उतरून सुद्धा काम करावे लागते. विकासाच्या घाईत ह्या बांधवांच्या व्यथा मात्र अजूनही दुर्लक्षितच राहिल्या आहेत.त्यांचे आरोग्य, त्यांना कामासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू ह्या गोष्टींकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. काम करता करता त्यांना जीव धोक्यात घालावा लागतो. हे काम करताना काही कामगारांचा जीव देखील गेल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत.
मागच्या वर्षी, अगदी वर्षाच्या सुरुवातीलाच, मुंबईच्या पवई येथील एक नऊ मित्र लांबीची सीवेजलाईन दुरुस्त करीत असताना चार कामगारांचा मृत्यू झाला. हे काम करताना जी क्रेन वापरली होती तिची केबल तुटल्यामुळे हे कामगार मॅनहोलमध्ये पडले व त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
त्यानंतर एका आठवड्याने तीन स्वच्छता कामगारांचा (मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स) काम करताना गुदमरून मृत्यू झाला. आजवर जितक्या स्वच्छता कामगारांचा ड्युटीवर असताना मृत्यू झाला आहे त्यापैकी गुदमरून मृत्यू होण्याऱ्या कामगारांची संख्या खूप जास्त आहे.स्वच्छ भारत अभियान जितके यशस्वी झाले आहे त्याचे श्रेय ह्याच बांधवांना जाते जे आपल्या जीवाची, आरोग्याची पर्वा न करता कुठल्याही संरक्षक आयुधांशिवाय मॅनहोल मध्ये उतरून काम करतात.
हेच स्वच्छ भारत अभियानाचे खरे शिलेदार आहेत. आपल्या देशात हे महत्वाचे काम पूर्वीपासूनच एक समाज करीत आला आहे. इतके कठीण काम करणे खरंच इतरांना शक्य नाही.तरीही ह्या समाजाला कायम उपेक्षाच मिळाली आहे. कुणीही आवडीने हे काम करत नाही. पूर्वीपासूनच हे काम ह्या लोकांवर समाजाने लादले आहे.
काळाच्या ओघात हे बंद व्हायला हवे होते पण ही अमानुष प्रथा आजही सुरुच आहे. मॅन्युअल सॅनिटेशनचे हे असुरक्षित आणि अप्रशस्त काम पूर्णपणे बंद होऊन ह्या बांधवांच्या हाताला एखादे चांगले काम मिळणे ही काळाची गरज आहे.
पद्मश्री सुधारक ओलवे ह्या छायाचित्रकारांनी ह्या स्वच्छता कामगारांचे भयावह आयुष्य जगापुढे आणण्याचे मोठे काम केले.मुंबईतील ३८ हजार स्वच्छता कामगारांच्या आयुष्यातील व्यथा त्यांनी “इन सर्च ऑफ डिग्निटी आणि जस्टीस- द अनटोल्ड स्टोरी ऑफ कॉन्झर्व्हंसी वर्कर्स” ह्या फोटो डॉक्युमेंटेशन प्रोजेक्टमधून जगापुढे आणल्या.
फोटोजर्नालिस्ट म्हणून काम करणाऱ्या ओलवे ह्यांनी १९९४ साली ह्या कामगारांचे रोजचे आयुष्य त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केले तेव्हाच ह्या प्रोजेक्टला सुरुवात झाली.
हृदयाला घरं पाडणारी ही छायाचित्रे बघितल्यानंतर वीस वर्षांनी २०१४ साली जून महिन्यात मिशन गरिमा सुरु करण्यात आले. हे मिशन बृहन्मुंबई महानगरपालिका आणि टाटा ट्रस्ट, मुंबई ह्यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आले आहे.
ह्या कामगारांना मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगदरम्यान (हाताने घाणीत काम करणे) जे असुरक्षित काम करावे लागते ते संपूर्णपणे बंद करणे किंवा कमी करणे हा ह्या मिशनचा उद्देश आहे.ह्या मिशनची उद्दिष्टये पूर्ण करण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स ह्यांना एक बेसलाईन सर्व्हे करण्याची विनंती करण्यात आली होती. ह्या सर्व्हेचे उद्दिष्टे पुढीलप्रमाणे होती.
- मुंबईत कोणत्याही स्वरूपाच्या मॅन्युअल कंझर्वन्सी कार्य करणार्या कामगारांची नेमकी संख्या निश्चित करणे.
- वॉर्ड्स, कामाचे प्रकार, वर्क प्रोफाईल आणि विभाग ह्या चार गोष्टींवर आधारित कामगारांची एकूण संख्या श्रेणीबद्ध करणे.
- ह्या बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी ह्या कामगारांना मॅन्युअली काम का करावे लागते हे शोधून काढणे.
अशारीतीने, ह्या सर्व्हेमध्ये कामगारांच्या वर्किंग कंडिशन्स, त्यांना उपलब्ध असणारी साधने, त्यांचे आरोग्य, गृहनिर्माण, मद्यपानाच्या सवयी, चौकीची अवस्था आणि त्यांच्यावर असणारे कर्ज ह्या बाबी जाणून घेण्यात आल्या.ह्या आधारभूत सर्वेक्षणाची पद्धत अशाप्रकारे डिजाईन करण्यात आली होती की, त्यातील डेटा कलेक्शनमध्ये एमसीजीएमच्या घनकचरा व्यवस्थापन, स्टॉर्म वॉटर ड्रेन्स आणि सीवरेज ऑपरेशन ह्या विभागांमध्ये काम करणाऱ्या सर्व कॉन्झर्व्हंसी कामगारांचा त्यात समावेश होईल.
ह्या सर्व्हेमध्ये असे लक्षात आले की सीवरेज ऑपरेशन आणि स्टॉर्म वॉटर ड्रेन्स ह्या विभागातील कर्मचाऱ्यांचे काम जवळपास सारखेच आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांचे काम ह्यापेक्षा वेगळे असते.इतर विभागांच्या तुलनेत घनकचरा व्यवस्थापन ह्या विभागातच सर्वात जास्त कर्मचारी काम करतात. ह्या सर्वेक्षणात एकूण ३९७२९ कर्मचाऱ्यांचा सर्व्हे करण्यात आला. त्यापैकी ३२५८८ कर्मचाऱ्यांची मुलाखत घेण्यात आली.३९७२९ पैकी ८०.३% हे पुरुष कर्मचारी आहेत तर १९.७% ह्या स्त्री कर्मचारी आहेत. ह्यापैकी २८,८४७ हे कायमस्वरूपी सेवेत आहेत तर उरलेले कंत्राटी पद्धतीने काम करतात.
ह्या सर्व्हेत ह्या कर्मचाऱ्यांनी असे सांगितले की त्यांच्या वर्किंग कंडिशन्समध्ये गेल्या अनेक वर्षांत काहीच मोठे बदल घडले नाहीत.२००० सालानंतर जेव्हा ओलवे ह्यांनी ह्या कर्मचाऱ्यांची भयावह परिस्थिती जगापुढे आणली तेव्हा थोडेबहुत बदल झाले इतकेच. पण त्यांच्या कामाचे स्वरूप आणि त्यासाठी ते वापरत असलेली साधने इतक्या वर्षांतही बदललेले नाही. त्यांचे काम कमी तर झाले नाहीच, उलट ते इतक्या वर्षात वाढलेच आहे.
मुंबईत जुन्या भागात आजही विकास घडलेला नाही. त्यामुळे तेथे काम करणाऱ्या ह्या कर्मचाऱ्यांच्या कामाचे स्वरूप सुद्धा इतक्या वर्षांत बदललेले नाही. हीच परिस्थिती मॅनहोल कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सुद्धा आहे.त्यांच्या कामाच्या स्वरूपात सुद्धा काहीच बदल झालेले नाहीत. आता विविध प्रकारची यंत्रे आहेत. पण त्यामुळे ह्या कर्मचाऱ्यांच्या कामात काहीच मदत होत नाही.
अजूनही ह्या बांधवांना मॅनहोलमध्ये उतरुनच काम करावे लागते. त्यांना जी आयुधे किंवा साधने मिळतात ती सुद्धा इतक्या वर्षात तशीच आहेत. अजूनही हे बंधू बांबू, रॉड, बकेट, कुदळ आणि फावडे घेऊन हातानेच काम करतात.पी एल लोखंडे मार्गावर काम करणारे मोटर लोडर आणि सफाई कर्मचारी म्हणून काम करणारे गोविंद हे भाऊ सांगतात की, “बेस्टच्या कर्मचाऱ्यांना खूप सुविधा मिळतात. पण आम्हाला मात्र कुठलीही सुविधा मिळत नाही. आम्हाला साबण, गणवेश आणि संरक्षणाची साधने सुद्धा मिळत नाहीत.आम्हाला ज्या खोल्या दिल्या जातात त्या बऱ्याचवेळा घाणेरड्या असतात, त्यात प्रसाधनगृहांची सोय नसते. तिथले पंखे बिघडलेले असतात आणि बसायला डेस्क सुद्धा नसतात. फार थोड्या कर्मचाऱ्यांना लॉकरची सोय दिलेली आहे. आमची कमाई कमी आणि खर्चच जास्त होतो.”स्वीपर कर्मचाऱ्यांनी असे सांगितले की, ते इतक्या वर्षांपासून त्याचप्रकारे काम करीत आहेत. रोज रस्ते झाडून, कचरा एकत्र करून तो कचरा कचरापेटीत जमा करणे किंवा कलेक्शन पॉइंटला जमा करणे ह्याच प्रकारे ते लोक काम करीत आहेत.त्यांचे झाडू, लाकडी पाटी, हातगाडी किंवा चाकांची कचरापेटी ही साधने भरपूर वर्षांपासून ते वापरत आहेत. त्यांना नवी साधने दिली गेलेली नाहीत.
गेल्या काही वर्षांत मुंबईत कचऱ्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. पण स्वच्छता कामगार मात्र तेवढेच आहेत. त्यांच्या संख्येत आवश्यक तेवढी वाढ झालेली नाही.
तसेच इतक्या वर्षांत मुंबईत भरपूर प्रमाणात इमारतींचे बांधकाम होत आहे. पण स्वच्छतागृहांची सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामात मात्र काहीही बदल झालेला नाही. त्यांना अजूनही जुन्याच पद्धतीने त्यांचे काम करावे लागते.
सार्वजनिक प्रसाधनगृहांमध्ये पाणी साठवण्याची समस्या अजूनही सुटलेली नाही त्यामुळे ह्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना खूप त्रासाचा सामना करावा लागतो. तसेच नालेसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या स्वरूपात सुद्धा काहीच बदल झाले नाहीत. त्यांच्या कामात तर आता आणखी अडथळे उभे राहिले आहेत.
झोपडपट्ट्यांत बांधकामे स्थिर स्वरूपाची नसतात. गल्ल्या दिवसेंदिवस लहान व अरुंद होत आहेत, पाण्याचे पाईप आणि केबल ड्रेनेज लाईनमधूनच जातात.
काही झोपडपट्ट्यांमध्ये ड्रेनेज लाईन्सवरच सिमेंट लावलेले असते. त्यामुळे असे सगळे असताना ह्या लाईन्स स्वच्छ करणे अतिशय कठीण काम आहे. नालेसफाई करणाऱ्या कामगारांना नागरिकांकडून सुद्धा त्रास होतो. तसेच त्यांना संरक्षक आयुधे, साधने दिली जात नाहीत. जी साधने मिळतात ती अतिशय निकृष्ट दर्जाची असतात.“आम्ही सुद्धा तुमच्यासारखीच माणसेच आहोत. आम्हालाही भावना आहेत .पण आमच्याकडे ना साधे बाथरूम आहे ना साधे टॉयलेट, आम्हाला चेंजिंग रूमची सुद्धा सुविधा नाही.”अजय हे बीएमसीमध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करतात. त्यांना ग्लोव्जशिवाय, नुसत्या हातांनी गगटर स्वच्छ करावे लागते. ते म्हणतात की, “आमची पिढी हेच काम करत होती. पुढे सुद्धा हेच काम करणार आहे. आम्हाला लोक कचरेवाला किंवा गटरवाला असे म्हणतात.ते म्हणतात की तुम्हाला महानगरपालिका ह्या कामाचे पैसे देते. आम्हाला माहितेय की आम्ही स्वच्छता करतो. कचरा उचलतो. पण त्याचा अर्थ असा नव्हे की, तुम्ही आम्हाला ह्याच नावाने हाक मारावी.
आम्हीसुद्धा तुमच्यासारखीच माणसेच आहोत. आम्हालाही भावना आहेत. पण आमच्याकडे ना साधे बाथरूम आहे ना साधे टॉयलेट, आम्हाला चेंजिंग रूमची सुद्धा सुविधा नाही. आम्हाला जेवायला जागा नाही आणि आराम करण्यासाठी सुद्धा जागा नाही हे तर ह्या लोकांना माहितीच नाहीये.”
थोडक्यात अजय स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आयुष्य कसे असते ह्याची आपल्याला कल्पना देतात. स्वच्छ भारत मिशनमध्ये फक्त स्वच्छतेवर लक्ष केंद्रित झाले आहे. पण ह्या मिशनची खरी जबाबदारी ह्या कर्मचाऱ्यांवरच आली आहे. हा सगळा भार तेच उचलत आहेत.ह्या मिशनचा कणा तर हेच स्वच्छता कामगार आहेत, पण दुर्दैवाने स्वच्छ भारत मिशन हे नेत्यांनी हातात झाडू घेऊन सेल्फी काढण्यापर्यंतच मर्यादित राहिले आहे.ह्या कर्मचाऱ्यांची परिस्थिती बदलण्यासाठी किंवा मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग थांबवण्यासाठी काहीच केले जात नाही. त्याबद्दल साधी चर्चाही होत नाही. जी साधने हे कर्मचारी स्वच्छतेसाठी वापरतात ती जुनी, खराब आणि अपुरी असतात. त्यांचे काम करताना त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल अशी साधनेच नसतात.
त्यांना घाणीच्या, कचऱ्याच्या साम्राज्यात काम करावे लागते. त्यांना सेफ्टी मास्क, ग्लोव्ज, सेफ्टी बेल्ट (मॅनहोल कर्मचाऱ्यांसाठी अत्यावश्यक), सेफ्टी शूज मिळत नाहीत.
ज्यांची मुलाखत घेतली त्यापैकी २२,५०८ कर्मचाऱ्यांना मास्क आणि हॅन्ड ग्लोव्ज मिळाले, पण त्यांची क्वालिटी अतिशय खराब होती तसेच ते वापरायला सोपे नसल्यामुळे बरेच कर्मचारी ह्या गोष्टींचा वापर करू शकत नाहीत.तसेच त्यांना ह्या गोष्टी कधीही वेळेत मिळत नसल्याचे ह्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. मुंबईत एकूण नऊ डायव्हर्स आहेत पण एकच डायव्हिंग सूट उपलब्ध असल्याचे कळले.
खरेतर, स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियमितपणे वैद्यकीय चाचणी करणे ही नागरी संस्थांची जबाबदारी आहे. पण असे घडत नाही. मोटर लोडर आणि मॅनहोल कर्मचाऱ्यांना त्वचाविकार आणि श्वसनाचे आजार होतात.तसेच त्यांना डेंग्यू, मलेरिया, पाठदुखी, गुढघेदुखी, अर्धांगवायू, उच्चरक्तदाब, क्षयरोग आणि ध्वनिप्रदूषणामुळे बहिरेपणा ह्या आजारांना सामोरे जावे लागते. ह्या सर्व्हेक्षणादरम्यान एकूण १०,१२२ कर्मचाऱ्यांनी तब्येतीच्या काही ना काही तक्रारी असल्याचे सांगितले.अमृतनगर येथे स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणारे सुशांत ह्यांनी सांगितले की, “रोज कुठल्या ना कुठल्या स्वच्छता कर्मचाऱ्याला ड्युटीवर असताना काम करताना दुखापत होते, पण बीएमसीच्या हॉस्पिटलला ह्याच्याशी काही देणे घेणे नसते.
जेव्हा बीएमसी हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांना लक्षात येते की ही व्यक्ती स्वच्छता कर्मचारी आहे, तेव्हा ते त्या कर्मचाऱ्याला अतिशय अमानवी आणि वाईट वागणूक देतात.”हे कर्मचारी आपली जबाबदारी पार पडून शहर स्वच्छ ठेवतात. पण त्यासाठी त्यांना त्यांच्या आरोग्याची किंमत चुकवावी लागते. २००४ ते २०१३ दरम्यान एमसीजीएमचे २६१४ कर्मचारी ड्युटीवर असताना काही ना काही कारणाने मरण पावले आहेत.म्हणजेच दर वर्षी जवळजवळ २६१ कर्मचाऱ्यांचा मृत्यू होतो. ८००३ म्हणजेच एक चतुर्थांश कर्मचाऱ्यांनी असे सांगितले की त्यांच्या घरची किमान एक व्यक्ती हे काम करताना मरण पावली आहे. कर्मचारी ड्युटीवर असताना जखमी झाल्यास त्यांना मूलभूत भरपाई सुद्धा मिळत नाही.
नुसते लांब उभे राहून ह्या कर्मचाऱ्यांविषयी कणव बाळगणे सोपे आहे. परंतु जेव्हा हे बांधव मॅनहोल मध्ये उतरून किंवा नाल्यात उतरून काम करीत असतात, नुसत्या हातांनी इतरांनी केलेला कचरा उचलत असतात तेव्हा त्यांच्या मनात काय भावना असतील ह्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही.नुसते ह्याबद्दल लिहून किंवा बोलून किंवा चर्चा करून त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत तर त्यावर काहीतरी थोडं निर्णय आणि त्यांची सर्व स्तरांवर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. तरच हे बांधव सुरक्षितपणे त्यांचे काम करू शकतील.