नागपुरी संत्री गेला दुबईला
नागपूर:- अवघ्या जगभरात आपल्या आंबटगोड चवीसाठी प्रसिद्ध असलेली रसाळ नागपुरी संत्री दुबईला पोहचणार आहेत. नागपूरमार्गे नुकतीच गेलेल्या या संत्र्यांची मुंबईतील नवी वाशी येथून निर्यात करण्यात आली. ऑरेंज क्लस्टरच्या माध्यमातून करण्यात आलेली ही पहिलीच निर्यात आहे. यात एकूण पंधराशे क्रेट्स संत्र्यंचा समावेश आहे.
दुबईने नागपुरी संत्र्याला पसंती दर्शविली आहे. चवीने ‘युनिक’ नागपुरी संत्री आतापर्यंत बांगलादेश, श्रीलंकेत निर्यात व्हायची. फळांची मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या दुबईतही नागपुरी संत्र्यांचा शिरकाव झाला आहे. कृषी आणि प्रसंस्कृत खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा) यांनी यासाठी नागपूर जिल्ह्यात संत्री क्लस्टर तयार केले आहे. या क्लस्टरच्या माध्यमातून झालेली ही पहिलीच निर्यात ठरली. नागपूर आणि आसपासच्या परिसरात संत्री दोन हंगामात होतात. ही संत्री निर्यातक्षम असल्याचे अनेक तज्ज्ञांनी यापूर्वी सांगितले आहे. त्यानुसार गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वेगवेगळ्या देशांत संत्री पाठविण्याचा प्रयत्न होत आहे.
नवे पर्व ठरणार
काही वर्षांपूर्वी पंजाबची संत्री दुबईत दाखल झाली. ती आकार, रंगाने मोहक दिसतात. पण चवीला चांगली नसतात. त्या तुलनेत नागपुरी संत्री चवीला चांगली आहेत. नागपुरी संत्र्यांची चव हेच वैशिष्ट्य आहे, असा उत्पादकांचा दावा आहे. त्यामुळे दुबईला झालेली निर्यात नागपुरी संत्र्याच्या इतिहासात एक नवे पर्व ठरणार आहे.