मच्छर वाढले; फवारणी करण्याचे महापौरांचे आदेश
शहरात मागील काही दिवसात मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला असून तातडीने सर्व झोन कार्यालयांनी त्यांच्या कार्यक्षेत्र परिसरात फवारणी (फॉगिंग) करावी, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी उपायुक्त तथा आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार यांना दिले आहेत.
शहरात ‘कोरोना’चा प्रसार वाढत असतानाच संपूर्ण आरोग्य यंत्रणा त्याचा प्रसार रोखण्यासाठी झटत आहे. याच दरम्यान शहरात मच्छरांचाही प्रादुर्भाव वाढत असून यामुळे मलेरिया आणि इतर रोगांची शक्यताही बळावली आहे. ‘कोरोना’चे संकट डोक्यावर असतानाच अधेमध्ये बरसणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी डबकी साचतात. यामुळे मच्छरांची संख्या वाढते आहे. धंतोली, रामदासपेठ या भागात सर्वाधिक रुग्णालये आहेत. या भागालाही वाढत्या मच्छरांचा त्रास सतावित आहे. भांडेवाडी परिसरात डम्पिंग यार्ड असल्याने दुर्गंधीसोबतच मच्छरांचाही त्रास नागरिक सहन करीत आहे. शहरातील उच्चभ्रू वस्त्यांसोबतच झोपडपट्टी परिसरातही हा त्रास वाढला आहे. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत बहुतांश नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागामध्ये फवारणीसाठी मलेरिया-फायलेरिया विभागाकडे फॉगिंग मशीनची मागणी केली. मात्र, पेट्रोल-डिझेल नसल्याचे कारण पुढे करून विभागाने फॉगिंग मशीन देण्यास नकार दिला, ही गंभीर बाब असल्याचे सांगत संपूर्ण झोन कार्यालयांतर्गत येणाऱ्या परिसरात, मच्छरांच्या उत्पत्ती स्थानांवर औषध फवारणी करण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी आरोग्य विभाग (स्वच्छता) तसेच मलेरिया-फायलेरिया विभाग आणि झोन कार्यालयांना दिले आहेत.