कोरोना काळात शहीद झालेल्या पोलिस कर्मचा-यांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाख रुपयांचे विमा कवच प्रदान
नागपूर: राज्यातील पोलिस दल कोरोना विरुद्ध लढाईत आपले कर्तव्य बजावत असताना आपल्या प्राणांची पर्वा न करणार्या पोलिसांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्यासाठी महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांचेकडील शासन निर्णयानुसार अधिकृत वारसांना सानुग्रह अनुदान म्हणून 50 लाख रुपये प्रदान करण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे त्याच अनुषंगाने नागपूर शहर पोलिस दलात कार्यरत, शहीद झालेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांच्या परिवाराला प्रत्येकी 50 लाख रुपयांचा धनादेश आज प्रदान करण्यात आले. नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाचे आस्थापनेवरील कार्यरत पोलिस कर्मचारी व पोलीस मुख्यालय नागपूर शहर येथे नेमणुकीस असलेले सहायक फौजदार भगवान सखाराम शेजुळ व धंतोली पोलीस स्टेशन येथे नेमणुकीत असलेले पोलीस हवालदार सिद्धार्थ हरिभाऊ सहारे हे दोन्ही पोलिस कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना covid-19 संक्रमण होऊन आजारी पडल्याने व त्यांचा वैद्यकीय उपचारादरम्यान मृत्यू होऊन ते शहिद झाले. नमूद पोलीस कर्मचाऱ्यांना सानुग्रह सहाय्य प्रस्ताव पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या आदेशान्वये पोलिस समाधान कक्ष पोलीस आयुक्त कार्यालय नागपूर यांनी मुदतीत कागदोपत्री कारवाई पूर्ण करून, पोलीस महासंचालक मुंबई यांच्यामार्फत, महाराष्ट्र शासनाला विनाविलंब सादर करून प्रत्येकी 50 लाख रुपये रक्कम मंजूर करून घेतली व आज शनिवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी पोलीस कर्मचार्यांचे वारसदारांस, पत्नी श्रीमती कुसुम भगवान शेजुळ व श्रीमती ईरा सिद्धार्थ सहारे यांना प्रत्येकी 50 लाख रुपयांचे धनादेश नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार व सह पोलीस आयुक्त श्री नीलेश भरणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या प्रसंगी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नमूद पोलीस कर्मचार्यांचे वारसांना त्यांना भविष्यात काही अडचणी आल्यास नागपूर शहर पोलीस सदैव पाठीशी राहून सहकार्य करेल असे आश्वासन दिले. याप्रसंगी श्री अमितेशकुमार पोलीस आयुक्त नागपूर शहर व सह पोलीस आयुक्त निलेश भरणे यांचे आदेशान्वये श्री गजानन राजमाने पोलीस उपायुक्त मुख्यालय यांचे मार्गदर्शनाखाली श्री राम शास्त्रकार, रिता कोहरे पोलीस समाधान कक्ष यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडली.