समाजहितासाठी कोरोनामुळे घेतला निर्णय,आरोग्याला प्राधान्य- डॉ. नितीन राऊत
नागपूर: नागपूर शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी समाजहिताला प्राधान्य देऊन आपल्या मुलाच्या कुणाल व आकांक्षा यांच्या विवाहानिमित्त आयोजित केलेला स्वागत समारंभ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
कुणाल व आकांक्षा यांच्या विवाहानिमित्त २१ फेब्रुवारीला स्वागत समारंभ आयोजित केला होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील काही शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. यातून नागपूर शहर सुद्धा दूर राहू शकलेले नाही. कोरोनावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. पालकमंत्री म्हणून माझेही प्रयत्न या संकटातून समाजबांधवांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी सुरू आहेत.
या पार्श्वभूमीवर कुणाल व आकांक्षांच्या विवाहानिमित्त आयोजित केलेला स्वागत समारंभ रद्द करणे हे माझे समाजकर्तव्य ठरते. नागपूर शहरातील माझ्या प्रियजनांचे आरोग्य चांगले राहावे, अशीच माझी मनीषा आहे. या हेतूने हा विवाहसमारंभ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाच्या विरोधात सुरू असलेल्या या लोकलढ्यात आपणही सहभागी व्हावे, जनतेनी मास्कचा वापर करावा, सॅनिटायझरने हात धुवावे व सुरक्षित अंतर राखावे, या त्रिसूत्रीचे पालन करावे असे आवाहन केले आहे.
निमंत्रितांना झालेल्या गैरसोयीबद्दल डॉ.नितीन राऊत आणि संपूर्ण राऊत कुटुंबीय दिलगिर असल्याचे त्यांनी कळविले आहे.