नागरिकांची ऑक्सीजन पातळी तपासणी: २८ ठिकाणी तपासणी केंद्रे
नागपूर:- कोरोनाशी लढा देताना मनपासह संपूर्ण आरोग्य विभाग व्यस्त आहे, त्यातच आता पोलिस ठाण्यांमधूनही लोकांच्या ऑक्सिजन पातळीची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी विभागीय आयुक्त संजीव कुमार, सीपी भूषणकुमार उपाध्याय, जिल्हा दंडाधिकारी रवींद्र ठाकरे, अति. आयुक्त जलज शर्मा यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
कोरोनाचे सतत वाढणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची ऑक्सिजन पातळी, विशेषत: साखर, बीपी आणि इतर आजारांनी ग्रस्त असणा-यांची मनपा आणि पोलिस विभाग संयुक्तपणे तपासणी करेल. शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता स्थानिक नगरसेवक व पोलिस निरीक्षक यांच्या उपस्थितीत शहरातील 28 पोलिस ठाण्यांमध्ये याची सुरूवात होईल. ज्यामध्ये काही स्वयंसेवी संस्था देखील सहभागी होतील.
मृत्यूचे आकडे कमी होऊ शकतात: चर्चेवेळी असे सांगितले गेले की शहरात कोरोनाचा संसर्ग सतत वाढत आहे. मृत्यूची संख्याही वाढत आहे. कोरोना रूग्णांमध्ये जेव्हा ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते तेव्हा रुग्णांचे आरोग्य अधिक खराब होते. भविष्यासाठी धोका निर्माण होतो. त्यामुळे रुग्णांच्या ऑक्सिजन पातळीची तपासणी केली जाईल.
या अभियानामधे मनपाचे कर्मचारी, स्वयंसेवी संस्था यांचे प्रतिनिधीदेखील पोलिसांसह लोकांच्या घरी जाऊन चौकशी करतील. नगरसेवकांच्या सहकार्याची अपेक्षा करीत महापौर संदीप जोशी म्हणाले की, प्राणवायूच्या पातळीचे परीक्षण केल्यास मृत्यूची संख्या कमी करण्यात यश मिळू शकते. लोकांना जवळच्या पोलिस ठाण्यात जाऊन तपासणी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.